स्वराज्याचे वारसदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सूर्यजीत इंगळे

गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या सर्वांनाच त्या त्या ठिकाणचं ऐतिहासिक-भौगोलिक – सामाजिक महत्त्व काय आहे, हे माहीत असणं शक्य नसेलही पण म्हणून ते जाणून घेणंही शक्य नाही असं नक्कीच नाही. खरंतर इतिहासातील संस्कृतीचा, त्या काळातील वास्तूचा वर्तमानावर परिणाम होत असतो कारण वर्तमान हे केवळ अन् केवळ इतिहासावरच अवलंबून असतं. याची जाण आपल्याला असायलाच हवी. म्हणूनच गडकिल्ल्यांवर जाणं ही केवळ औपचारिकता न राहता तो संस्कार बनायला हवा.

अलीकडे काही तरुण, काही इतिहासाची आवड असणारे, वाचन करणारे, काही सोशल मीडियावर इतरांचे बघून ‘भारी दिसतंय रे, आपणसुद्धा जाऊन येऊ’ असे म्हणून जाणारे, काही फक्त फोटोचं व्यसन असणारे ‘एक या कॅमेऱयामध्ये, एक त्या कॅमेऱयामध्ये, एक खास आणलेल्या डीएसएलआरमध्ये, फोटो काढण्यासाठी येणारे, कोणी ग्रुपने आठवडय़ाभराचा शीण घालवायला आलेले, कोणी व्यायाम प्रकार म्हणून गडावर चढाई करणारे, कोणी फॉरेनर मित्र-मैत्रिणींना घेऊन येणारे असे अनेकजण गडकिल्ल्यांना भेटी देऊ लागलेत. असे हे गडकिल्ल्यांबद्दलचे प्रबोधन (प्रोमोशन?), क्रेझ वाढत चालली आहे. पूर्वी पुस्तके वाचावी लागत होती आता काही क्लिकवर – थोडय़ा थोडय़ा स्क्रोलवर फोटो आणि माहिती-जाहिराती मिळत आहेत. मीही थोडा थोडा करून या सर्वांपैकीच एक. नुकताच किल्ले राजगडवर पुन्हा एकदा जाऊन आलो आणि आलेला अनुभव फारसा काही वेगळा नव्हता.

आपली धार्मिक क्षेत्रं. तिथे कोणी साकडं घालायला जातो, कोणी देवाला आमिष दाखवायला-नवस बोलायला जातो, कोणी मनाला तजेला मिळावा म्हणून जातो, कोणी फक्त दर्शन घ्यायला जातो, कोणी मनाची घालमेल आपल्या श्रद्धास्थानाला ऐकवायला जातो, कोणी तिथेही तिथलं बांधकाम-इतिहास बघायला -जाणून घ्यायला जातो. पण तिथे गेल्यावर कोणी मोठया आवाजात गाणी वाजवून धिंगाणा घालत नाही, मंदिर-मशिदीच्या आवारात-प्रांगणात पचापच पिचकाऱया मारत नाही, तिथे गाभाऱयात कोणी बिस्कीटचे पुडे, चिप्सची पाकिटं, पानमसाला-तंबाखू-चुना-च्युइंगम-चॉकलेटच्या पुडय़ा-आवरणं टाकत नाही, तिथे मित्र-मैत्रीण गळ्यात गळे घालून बसत नाहीत. तिथे शिस्त असते, त्या जागेचा मान असतो, त्या अज्ञात-अदृश्य-न पाहिलेल्या शक्तीची भीती असते.

हीच सर्व शिस्त आपापल्या धार्मिक स्थळी पाळणारे, शिकले सवरलेले, अंगठेबहादूर, आस्तिक, नास्तिक, कट्टर, कर्मठ, शिष्ठ, उर्मट, प्रेमळ, साधे, भोळे, ब्रॅण्डेड, गावठी, हुशार, मठ्ठ इत्यादी सर्व जण गडकिल्ल्यांवर का नाहीत पाळत? ज्या गोष्टी आपण तिथे गडकिल्ल्यांवर पाहत आहोत त्या पोथ्या-पुराणातील कहाण्या नाहीत, त्या एक जागता इतिहास आहेत, तिथे घडलेल्या घटना दैवी चमत्कारांहून कमी नाहीत, तिथे राहून गेलेले लोक देव-देवदूतांहून कमी नाहीत.

भले राजमाता जिजाऊसाहेब, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि समकालीन सर्व व्यक्तींना आपण देव म्हणत नाही. त्यांची देव्हाऱयात प्रतिमा मांडून पूजा करत नाही आणि त्यांना देवत्व देऊन त्यांच्या कर्तृत्वाला चमत्काराचं रूप देऊ ही नये खरं, परंतु त्यांचं अस्तित्व-त्यांच्या कर्तृत्वाची आणि व्यक्तिमत्त्वाची उंची दैवीच आहे. त्यांचा पदस्पर्श झालेल्या, त्यांचं आयुष्य पाहिलेल्या-अनुभवलेल्या, त्यांच्यासोबत जगलेल्या, त्यांनी उभारलेल्या त्या जागा-वास्तू धार्मिक स्थळांहून कमी पवित्र नाहीत. त्या वास्तू खऱया अर्थाने शक्तिस्थळं आहेत. तिथे जाऊन बेजबाबदार, बेछूट वागणं हा तिथे जगलेल्या, लढलेल्या, बलिदान दिलेल्या छत्रपतींचा-मावळ्यांचा अपमान आहे. तिथे जाऊन कचरा करणं, तिथल्या शिळांवर-कडेकपारींवर आपली नावं कोरणं, तिथे जागोजागी आपल्या बरबटलेल्या लाल तोंडाने पचापच थुंकणं हे त्या वीरांच्या सांडलेल्या रक्ताची-घामाची-अश्रूंची खिल्ली उडवण्यासारखं आहे. तिथला निसर्गसुद्धा पवित्र आहे. आपल्या शहरांहून स्वच्छ व सुंदर आहे म्हणून तर आपण तिथे गेलो आहोत. तिथे जाऊन स्वतःला ताजेतवाने करून त्या ठिकाणाला मात्र यथेच्छ कचरा करून घाण करणे कितपत योग्य आहे?

बहुतांश सारे किल्ले हे सरकारच्या-पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहेत. मोजक्या किल्ल्यांची काही प्रमाणात डागडुजी करण्याचा प्रयत्न झाला आहे. बाकी सर्व किल्ल्यांची अवस्था कुठे ना कुठे राजकारण-समाजकारणाशी जोडलेली आहे. फक्त राज्यकर्त्यांनीच नाही तर आपण सामान्य जनतेनेही या गडकोटांचं संवर्धन-संरक्षण करणं गरजेचं आहे. येणाऱया कैक पिढय़ांना हे गडकोटच आधार, प्रेरणा देत राहतील, त्यांना बघून – इतिहास जाणून, बिघडणारे घडतील, बेताल वागणारे तालावर येतील, पण त्यासाठी ते किल्ले असायला हवेत आपल्या रुबाबात, ऐश्वर्यात.

सिनेमा फक्त मनोरंजन म्हणून नसावा. त्यातून गडकिल्ल्यांचे नियमही समजावेत आणि ते आताही लागू व्हावेत. किल्ले तेव्हाही दुर्गम होते, अजूनही आहेत. जसे धार्मिक स्थळांचे दरवाजे ठरावीक वेळी बंद होतात तसेच किल्ल्यांचेही व्हावेत. यातून सर्वांना शिस्तीचा एक पाठही मिळेल. तिथलं पावित्र्य राखलं जाईल. जाणाऱयांनी तिथला इतिहास वाचून, माहिती करून तिथे जावं. याने तिथे जाण्याचा आनंद अजून वृद्धिंगत होईल.

खरंतर इतिहास आपल्याला ऊर्जा देतो, प्रेरणा देतो, आतून पेटवतो, शिकवतो, विचार करायला लावतो, वर्तमानातल्या आणि भविष्यातल्या अनेक प्रश्नांना सोडवण्याचे मार्ग दाखवतो आणि अजून बरंच काही करतो. पण इतिहासाची एक बाजू हीसुद्धा आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होते आणि तेव्हा इतिहासच तारूनही नेतो. म्हणून आपल्या जाज्वल्य इतिहासाची, आपल्या गडकिल्ल्यांची पुनर्बांधणी, संवर्धन, संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांचं पावित्र्य आपण राखले पाहिजे त्याबद्दल जनजागृती करायला हवी आणि त्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून करायला हवी.

आजकाल अनेक जण सोशल मीडियावर बनलेल्या समूहांनी गडकिल्ल्यांवर भ्रमंतीसाठी जाण्याचा ‘ट्रेंड’ आला आहे. आपण तसे एखाद्या समूहात किंवा आपले आपण गडांवर गेल्यावर तिथे असलेला कचरा थोडा थोडा करून गोळा करून खाली आणता येईल, गडांची-गडवाटांची स्वच्छता करता येईल, गडावर आपल्यासारखेच आलेले आणखी पर्यटक बोलावले-आवाहन केले तर तेही आनंदाने अशा स्वच्छता मोहिमेत सहभागी होतील. आपण निर्माण करत असलेला कचरा आपल्यासोबत खाली आणता येईल. ढासळलेले चिरे गडावर एक ठिकाणी सर्वांनी मिळून गोळा तरी करून ठेवता येतील. गडांवरचे पाणीसाठे स्वच्छ करता येतील, राजगडावरील टाक्याप्रमाणे पिण्याचे पाणी म्हणून ज्या त्या गडावरील टाकी पूर्वीप्रमाणे वापरता येतील. गडांवरील धार्मिक स्थळं-राजवाडे-महाल आणि इतर बांधकामांचे अवशेष जमतील तसे जतन करता येतील. सर्वसामान्यांनी थोडा थोडा वेळ आणि कष्ट घेऊन या गोष्टी करणं नक्की शक्य आहे. शासकीय पुरातत्व खात्याने ही सामान्य जनतेने खात्याला कशा प्रकारे मदत करता येईल, कोणत्या गोष्टी/मदत सामान्य जनता करू शकेल हे सांगितल्यास त्या प्रकारेही दुर्गप्रेमी नक्कीच दुर्गसंवर्धनात सहभागी होईल आणि आपले गडकिल्ले चिरायू होतील.

सर्वांनी स्वतःपासून सुरू करून आपलाच ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे. थोडी जनजागृती, थोडी खंत, थोडी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी सर्वांची आपल्या स्वराज्याप्रति-छत्रपतींप्रति असलेली आस्था-प्रेम जागृत करण्यासाठी आपण प्रत्येकाने पुढे आले पाहिजे तर आणि तरच स्वराज्याचे &हे वारसदार जतन होतील.

[email protected]