कामावरून काढलेल्या कामगारांनी केली मर्क्स कंटेनरच्या अधिकाऱ्यांना मारहाण

दगडफेकीत जखमी पोलीस.

राजकुमार भगत । न्हावाशेवा

द्रोणागिरी नोड परिसरातील मर्क्स ( एपीएमसी ) कंटेनर यार्ड मधील कामावरून काढलेल्या कामगारांनी सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या बसवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत एका पोलिसासह दोन कामगार जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ते 25 पुरूष आणि 7-8 महिला दुचाकीवरून येऊन हा हल्ला केला. उरण पोलीस ठाण्यात याबाबत दंगलीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मर्क्स कंपनीचे कामगार सकाळी दोन बसमधुन कंपनीत कामावर येण्यासाठी निघाले होते. या बस करळफाटा येथे आल्यानंतर दबा धरून बसलेल्या बडतर्फ कामगारांनी व त्यांच्या नातेवाईकानी अचानक या दोन्ही बसवर तुफान दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत दोन्ही बसच्या काचा फुटल्या असून एका पोलीसासह दोन कामगार जखमी झाले आहेत. कामगारांच्या या हिंसक प्रतिक्रियेमुळे कंपनीतील वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. एपीएम टर्मिनल (ए.पी. मोल्लर) सीएफएस मधील 99 कामगारांना कोणतेही ठोस कारण न देता जानेवारी महिन्यापासून कामावरून काढून टाकले आहे. या कामगारांना कामावर घ्यावे म्हणून अनेक वेळा मोर्चे काढण्यात आले होते मात्र या कामगारांना कामावर घेतले नाही. मागील महिन्यात 3 ऑगस्टला देखिल या कामगारांनी कंपनीच्या कामगारांची गाडी अडवून अधिकाऱ्यांना व कामगारांना मारहाण केली होती. या मारहाणीनंतर कंपनी प्रशासनाने जर असे प्रकार सुरू राहिले तर या भागातील सर्व गोदामे (सीएफएस) बंद करण्याचा इशारा दिला होता. आत्ता परत एकदा या काढून टाकलेल्या कामगारांनी कंपन्याच्या गाडीवर हल्ला केल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. जेएनपीटी परिसरात एपीएम अर्थात ए.पी. मोल्लर या डेन्मार्कच्या कंपनीची तिन गोदामे आहेत तर पनवेलमध्ये शिरढोण गावानजीक एक गोदाम आहे. या गोदामात सुमारे 900 कामगार कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत.

पहिल्या प्रकारानंतर डेन्मार्क राजदुताच्या प्रतिनिधीनी या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. नवीमुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे या प्रकरणी तक्रार केली होती. आणि असे पुन्हा घडले तर या भागातील कंपन्या बंद करण्याचा इशारा दिला होता. कामगारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे कंपनीत सध्या काम करणाऱ्या 900 कामगारांच्या नोकऱ्यांवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान आजच्या दगडफेकीनंतर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कामगारांची धरपकड सुरू केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या