
>> मंगेश दराडे
नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिका साकारतोय. नुकत्याच प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात स्वप्नील डी ग्लॅमर लुकमध्ये झळकत आहे. यानिमित्त त्याच्याशी साधलेला संवाद.
‘मोगरा फुलला’मधील भूमिकेबाबत स्वप्नील म्हणाला, कलाकाराचा लूक हे कलाकार ठरवत नाही, तर कथानकाची गरज ठरवते. यात सिनेमात मी टिपिकल मध्यमवर्गीय मराठी तरुणाची भूमिका साकारतोय. आईच्या शब्दाबाहेर तो अजिबात जात नाही. पण त्याच्या आयुष्यात एक मुलगी आल्यावर काय होते? त्याच्या प्रेमाचा मोगरा फुलतो का? हे तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल.
‘मोगरा फुलला’ निमित्ताने नीना कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी मायलेकाची भूमिका साकारतायत. नीनाताई यांच्यासोबत काम करणे हा अविस्मरणीय अनुभव असल्याचे स्वप्नील सांगतो. मराठी सिनेमांच्या सद्यस्थितीबाबत तो म्हणाला, मराठी सिनेमांना ग्लॅमर आले आहे. कोणते कलाकार सिनेमात आहेत याकडे प्रेक्षकांचे लक्ष असते. हिंदी असो का मराठी सगळीकडे स्टार सिस्टम चालते, पण फक्त स्टारडमवर सिनेमे चालणे कठीण असल्याचे प्रामाणिक मत स्वप्नीलने व्यक्त केले. चांगले कथानक, उत्तम मांडणी, कलाकारांचा चांगला चमू असेल तरच मराठी सिनेमे चालतात. मराठी प्रेक्षक आजही कथानकाला प्राधान्य देतात. माझा सिनेमा आहे म्हणून प्रेक्षक फार तर दोनऐवजी चार तिकिटे घेतील, पण शेवटी चांगली गोष्ट असेल तरच प्रेक्षक सिनेमा एन्जॉय करतील असे तो म्हणाला. स्वप्ना वाघमारे-जोशी नंतर श्रावणी देवधर या महिला दिग्दर्शकासोबत स्वप्नील काम करतोय. कुठल्याही गोष्टीकडे महिला जास्त संवेदनशील पद्धतीने बघतात. खासकरून नातेसंबंधांवरील गोष्टीत. हळुवार नाते, त्यातली गुंतागुंत महिला दिग्दर्शिका चांगल्या पद्धतीने मांडू शकतात, असे स्वप्नील सांगतो.


























































