फर्स्ट टेक – अ…अभिनयाचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>स्वरा सावंत 

घरात सगळी शिक्षक मंडळी…तरीही ऍक्टिंगचा ‘अ’सुद्धा कोणी गिरवला नव्हता. दहावीनंतर रस्त्यावर सार्वजनिक उत्सवात पाहिलेलं नाटक अभिनयाची बाजू कळायला कारण ठरलं आणि इथून जे काही करेन ते थिएटरसाठी असा निश्चय केला. सगळय़ांना यासाठी तयार करण्यात कस लागणार होता. राहते घर, नोकरी, नागपूर सोडून मुंबईची वाट धरली. प्रवास सोपा नव्हता, पण स्वतःवरचा आत्मविश्वास दृढ होता… सांगतोय अभिनेता संचित चौधरी.

अभिनय कळायला लागला तेव्हापासून वर्ल्ड थिएटर काय असतं हे जाणून घेण्याची इच्छा व्हायला लागली. रस्त्यावरचे ते स्किट गेम चेंजर ठरले. त्या ग्रुपला जॉईन केलं, शिकत राहिलो यादरम्यान कॉलेज केलं. घरच्यांना मला इंजिनीअर किंवा शिक्षक करायचे होते, पण मी हॉटेल मॅनेजमेंटची इच्छा दाखवली. त्यावर एकमत न झाल्याने मी डी. एड करून शिक्षक झालो. तीन वर्षे गेली कशीबशी, पण घुसमट वाढत होती. शेवटी निर्णय घेतला. कमावलेला पैसा होता बरोबर, पण तेव्हा घरच्यांचा सपोर्ट नव्हता आणि मी मुंबईत आलो.

दिवसभर पृथ्वी थिएटरमध्ये जाऊन बसायचो. त्यांच्या टीमसोबत थेस्पोला भाग घेतात. ‘त्रिकोण का चौथा कोण’ नाटक गाजलं. कौतुकही झालं, पण म्हणावे तसे पैसे मिळत नव्हते. दरम्यान, मिठीबाई कॉलेजमध्ये थिएटर शिकवण्यासाठी नोकरी मिळाली.   येथे एका सीनिअरसोबत भांडण झालं आणि मी नोकरी सोडून निघालो. मालाडला रिक्षाने जात असताना नागपूरच्या मित्राचा कॉल आला आणि कॅरेक्टर रोलसाठी बोलावलं.

रस्त्यावर शूटिंग होतं, ओएस, मास्टर, क्लोज काहीही माहीत नव्हत. मेकअप नाही थोडेसे डायलॉग. आपण काय करतोय हेच कळत नव्हतं. पण तितक्याच इंटेनसिटीने मी ते काम केलं. दोन दिवसांनी मला फोन आला लीड रोलसाठी सिलेक्ट झाल्याचा. कधीच ऑडिशन दिली नाही. केवळ एका पासिंग रोलवरून लीड माझ्यासाठी मोठी उडी होती. शेवटी रस्त्यावर सुरू झालेला हा प्रवास अनेक वळणं घेत यशाच्या मार्गावर घेऊन आलाच.

 नवीन मुंबईत आलो तेव्हा घर मालकाने जास्त लोक राहत होतो म्हणून घराबाहेर काढलं. मी आणि माझा मित्र निखिल सामानाच्या बॅगा घेऊन फिरत होतो. नवीन ठिकाणी राहण्याची सोय करायची होती, तोपर्यंत सामान कुठे ठेवणार असा प्रश्न होता. एका टेम्पोचालकाच्या मदतीने आम्ही वझीरा नाका परिसरात एका शिवसैनिकाला भेटलो. त्यांनी आम्हाला सामान ठेवण्यासाठी जागा दिली. त्यानंतर 15 दिवसांनी आम्हाला घर मिळालं. मुंबईत आल्यावर पहिली मोलाची मदत मिळाली ती शिवसैनिकाकडून.

बाबांची तंबी

शिक्षकाची नोकरी सोडून अभिनयासाठी मुंबईला जायचे ठरवले तेव्हा बाबांनी तंबी दिली की, दोन वर्षांत काही नाही झालं तर नागपुरात परत यायचं. मी पण हट्टी होतो. ठरवलेलं की काही होत नाही तोपर्यंत जायचं नाही. चार वर्षे लागली, बाबांनी बोलणं सोडून दिलेलं. पहिला शो ‘स्टार प्रवाह’वर सुरू झाला आणि घरच्यांना कळलं पोट्टा काही तरी करतोय. त्यानंतर बाबा बोलू लागले. आता सगळं ओक्के आहे.

पर्याय तयार ठेवा

नवीन येणाऱया कलाकारांनी स्वतःला एका कोशात बांधून नका ठेवू. प्रयोगशील आणि फोकस राहा, पर्याय तयार ठेवा, संधी शोधत राहा. एकाच प्रकारच्या कामात अडकलं तर अन्य बाजूने येणाऱया संधी निघून जातात. थिएटर, टेलिव्हिजन फिल्म असं प्रत्येक माध्यम आजमावून बघा.