
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराट नावाचा सुप्त ज्वालामुखी रविवारी जागृत झाला आणि या ज्वालामुखीच्या स्फोटात पाकिस्तानी संघाचे विजयाचे स्वप्न पार चूर चूर झाले. विराटने आपल्या टी-20 कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारताना 53 चेंडूंवर नाबाद 82 धावांची खेळी करीत पाकिस्तानविरुद्ध अशक्य वाटणारा विजय संघाच्या पारडय़ात टाकला. त्याच्या या खेळीने हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांचा दिवाळीचा आनंद शतगुणित झाला असून दिग्गज क्रिकेटर आणि चक्क आयसीसीही विराटच्या प्रेमात पडली आहे. ‘किंग इज बॅक’ असे म्हणत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोहलीवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. युवराज आणि सचिन तेंडुलकर हे दिग्गज स्टार खेळाडूही विराटच्या खेळीवर बेहद्द खूश झाले आहेत.
विराटच्या विजयी खेळीने पाकिस्तानचे सलामीला विश्वचषक विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले आणि हिंदुस्थानी क्रिकेटशौकीन विराटच्या प्रेमात आकंठ बुडाले. 2007 च्या टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एकाच षटकात 6 षटकार ठोकणाऱ्या युवराजसिंगने ‘किंग कोहली इज बॅक’ असे ट्विट करीत आपल्या या मित्राचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने तर ‘विराट कोहली, निःसंशयपणे ही तुझ्या जीवनातील सर्वोत्तम खेळी आहे. तुला खेळताना पाहणे हा एक सुखद अनुभव होता. 19 व्या षटकात रौफच्या चेंडूवर बॅकफूटवरून मारलेला तुझा षटकार दर्शनीय होता’, अशा शब्दांत फॉर्ममध्ये परतलेल्या विराटचे कौतुक केले आहे. विराट कोहलीचा साथी मिस्टर 360 डिग्री एबी डिव्हिलिअर्सने लिहिले – ‘विराट, माझ्या मित्रा, ते स्पेशल आणि इक्रेडिबल होते. बेस्ट ऑफ द बेस्ट.’ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने, विराट, आम्ही तुला किंग का म्हणतो हे तू पाकिस्तानविरुद्धच्या अफलातून खेळीने जगाला पुन्हा दाखवून दिले आहेस. टीम इंडियाच्या रविवारच्या विजयाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.
आयसीसीही विराट खेळीच्या प्रेमात
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही किंग कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या खेळी नंतर, ‘किंग इज बॅक.’ टेक अ बो, विराट कोहली असे ट्विट करीत विराटच्या जबरदस्त खेळीला मानवंदना दिली. टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंदर सेहवाग याने, हॅप्पी दिवाली हिंदुस्थानी भाइयों! विराटने जबरदस्त इनिंग खेळून टीम इंडियाला एक शानदार विजय मिळवून दिलाय. नक्कीच विराटच्या कारकिर्दीतील ही अफलातून खेळी आहे याबद्दल कुणाचेही दुमत होणार नाही, असे उद्गार काढत विराटच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘आजचा सामना नर्व्हस करणारा होता. आधी हा 95 टक्के आमच्या बाजूने होता, पण विराट कोहलीने वर्ल्ड क्लास मॅच विनिंग खेळी केली. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या.’
रिलॅक्स पडोसीयो, इटस् ओन्ली अ मॅच -सेहवाग
पाकिस्तानी संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानात मातमचे वातावरण असताना हिंदुस्थानचा माजी सलामीवीर वीरेंदर सेहवाग याने, रिलॅक्स पडोसीयो, इट्स ओन्ली अ मॅच. टीव्ही क्यो फोड रहे हो असा चिमटा, हिंदुस्थानने चीटिंग केली… अशी ओरड करणाऱ्या संतप्त पाकिस्तानी क्रिकेटशौकिनांना काढला. तर माजी फिरकीवीर हरभजन सिंग याने, यहाँ दिवालीके फटाके फोड रहे है, और हमारे पडोसी गुस्सेसे टीव्ही फोड रहे है, अशा शब्दांत पाकिस्तानी क्रिकेटशौकिनांना सुनावले.



























































