#CoronaEffect – हिंदुस्थान ऐवजी आता UAE मध्ये होणार टी-20 वर्ल्ड कप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकट लक्षात घेत हिंदुस्थानात होऊ घातलेली टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा आता यूएईमध्ये स्थानांतरित करण्यात येत आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याबाबत माहिती दिली आहे. शाह यांनी सांगितलं की, बीसीसीआय सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) माहिती देणार आहे की, टी -20 वर्ल्ड कप युएईमध्ये हलविण्यात येत आहे. बीसीसीआयने आयसीसीकडे यासाठी 28 जूनपर्यंत मुदत मागितली होती. तसेच आयपीएल 2021 चे उर्वरित सामनेही युएईमध्येच खेळले जाणार आहेत.

एएनआयशी संवाद साधताना जय शाह म्हणाले, ‘आज आम्ही आयसीसीला टी -20 वर्ल्ड कप स्पर्धा युएईमध्ये हलवत असल्याची माहिती देणार आहोत. स्पर्धेची तारीख आयसीसी ठरवणार आहे.’ टी -20 वर्ल्ड कप स्पर्धा 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला रंगणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. टी -20 वर्ल्ड कप स्पर्धा होण्यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) उर्वरित 31 सामने युएईमध्येच खेळले जाणार आहेत. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळला जाईल.

दरम्यान, यापूर्वी आयसीसीने स्पष्ट केले होते की टी -20 वर्ल्ड कप स्पर्धा युएईमध्ये स्थानांतरित करण्यात आली असली तरी यजमानांचे अधिकार बीसीसीआयकडेच राहणार आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणारा टी -20 विश्वचषक कोरोनामुळे पुढे ढकलला गेला होता. जो आता पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये खेळला जाईल.