श्रीलंकेने नामिबियावरील राग यूएईवर काढला, दुसऱ्या पात्रता लढतीत मिळवला दमदार विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या पात्रता लढतीत नामिबियासारख्या दुबळय़ा संघाकडून पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती. मात्र श्रीलंकेने नामिबियावरील या पराभवाचा सगळा राग मंगळवारी संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएई संघावर काढताना 79 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाथुम निशांकाचे दमदार अर्धशतक व दुष्मंथा चमीरा, वानिंदू हसरंगा यांची अचूक गोलंदाजी ही श्रीलंकेच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. पाथुम निशांका या सामन्याचा मानकरी ठरला.

यूएईच्या फलंदाजांची शरणागती

श्रीलंकेकडून मिळालेल्या 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईचा 17.1 षटकांत केवळ 73 धावांत खुर्दा उडाला. त्यांच्याकडून आयन अफजल खान (19), जुनैद सिद्धिक (18) व चिराग सुरी (14) हे दुहेरी धावा करणारे फलंदाज ठरले. श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने यूएईची आघाडीची फळी कापून काढताना 15 धावांत 3 विकेट घेतल्या. फिरकीपटू वानिंदु हसरंगाने 8 धावांत 3 विकेट घेत मधल्या फळीला भगदाड पाडले. महिश थिक्षणाने 15 धावांत 2 विकेट घेत शेपटाला गुंडाळले.

हिंदुस्थानी वंशाच्या मयप्पनची हॅटट्रिक

यूएई संघातील हिंदुस्थानी वंशाचा फिरकीपटू कार्तिक मयप्पनने यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक नोंदविण्याचा पराक्रम केला. त्याने 15 व्या षटकातील चौथ्या, पाचव्या व सहाव्या चेंडूंवर अनुक्रमे भानुका राजपक्षे, चरिथ असलंका व दासुन शनाका यांचे बळी टिपले. यंदाच्या स्पर्धेतील ही पहिलीच हॅटट्रिक असली तरी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील ही पाचवी हॅटट्रिक ठरली. याआधी ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली (बांगलादेशविरुद्ध, केपटाऊन-2007), आयर्लंडचा कर्टिस कँफर (नेदरलॅण्ड्सविरुद्ध, अबुधाबी -2021), श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा (द. आफ्रिकेविरुद्ध, शारजा-2021) व दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा (इंग्लंडविरुद्ध, शारजा – 2021) यांनी टी-20 विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रिकचा पराक्रम केलेला आहे.