
चीनसह जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. अमेरिका, इराण, जपान आणि हिंदुस्थानातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे चीनच्या जवळच असलेल्या तैवानमध्ये कोरोनाची साथ पसरली नाही. चीनमध्ये सुमारे साडेआठ लाख तैवानी नागरिक राहतात आणि तेथे कामही करतात, असे असूनही तैवानमध्ये ही साथ पसरली नाही. चीनच्या जवळ असल्याने तैवानला या व्हायरसचा सर्वाधिक धोका होता. मात्र, तेथील प्रशासनाने कठोर उपाययोजना करून या साथीचा फैलाव रोखला आहे. त्यामुळे तैवानने नेमकी काय पावले उचलली, याचा इतर देशांकडून आढावा घेण्यात येत आहे.
चीनमध्ये नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाची साथ पसरली. त्यावेळी नववर्षाच्या सुट्ट्या असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरले. तसेच हे संक्रमण सुरू झाल्यावर चीनने ताताडीने पावले उचलली नाहीत. याचा प्रभाव दिसू लागल्यावर चीनमध्ये हालचाली करण्यात आल्या. त्यामुळे यावर नियंत्रण आणणे कठीण होत आहे. मात्र, जगभरात या व्हायरसवर चर्चा सुरू असताना नेमके कशामुळे हे संक्रमण होते, यावर खल सुरू असतानाच तैवानने या संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. जागतिक आरोग्य संघटनेकडून सूचनांची वाट बघण्याऐवजी तैवानने भूतकाळातील अनुभवाच्या आधारे रोग फैलावणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळे चीजवळ असूनही या देशात कोरोनाचा फैलाव झाला नाही.
तैवानला याआधी सार्सचा (एसएआरएस) मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यातून आम्ही धडा घेतला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार तैवानमध्ये होऊ नये, यासाठी आम्ही तयारी केली होती, असे ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या जनआरोग्य विभागाचे प्रोफेसर चुनहेई ची ने यांनी सांगितले. सार्सनंतर आम्ही अशा रोगांचा फैलाव रोखण्यासाठी सेंट्रल कमांड सेंटर स्थापन केले आहेत. त्या सेंटरच्या मदतीनेच इतर देशांच्या तुलनेत तैवानने कोरोना रोखण्यात आघाडी घेतली आहे. या सेंटरमुळे आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती एकत्रित करणे, तसेच संभाव्य प्रभावित प्रांतामध्ये औषधोपचारासह आवश्यक त्या सामग्री पोहचणे सहज शक्य होते. त्यामुळे संशयित कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांना आयसोलेट वार्डमध्ये ठेवणे सहज शक्य झाले. सार्सचे अनुभव गाठीशी असल्याने तैवानने इतर देशांतून प्रामुख्याने चीनहून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी माणसांपासून माणसांना संक्रमण पसरते किंवा नाही, हे स्पष्ट झाले नसतानाही तैवानने आवश्यक ती खबरदारी घेतली होती. तसेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच तैवानने सर्जिकल मास्कचे वितरण सुरू केले होते. तसेच चीनमध्ये प्रवाशांना जाण्यास मज्जाव केला होता. तसेच मकाऊ आणि हाँगकाँगमधून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस आयसोलेट वॉर्डमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात येत होते.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेसाठी सॅनिटायझर वापरणे आणि तापाच्या लक्षणांची तपासणी करणे सक्तीचे करण्यात आले होते. तैवानच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल आणि इतर आरोग्य यंत्रणांनी कोरोनाच्या संशयितांवर देखरेख ठेवत त्यांच्या आरोग्याचा नियमित पाठपुरावा केला. तसेच हे रुग्ण असलेल्या ठिकाणी मोबाईलद्वारे अपडेट देत कोरोनाची लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. तैवान सरकार, प्रशासन आणि आरोग्य विभाग कोरोना रोखण्यासाठी सतर्क होता, असे स्टैनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर पॉलिसी अँड प्रिवेंशनचे संचालक जैसन वांग यांनी सांगितले. त्यामुळे कोरोनाने जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केल्यावर आम्ही आणखी कठोरतेने उपाययोजनांची अंमलबजावणी केली, असे त्यांनी सांगितले. तैवानप्रमाणेच सिंगापूरमध्येही सुरुवातीपासूनच सतर्कता बाळगळ्यामुळे तेथेही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला नाही. आशियातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र असूनही सिंगापूरमध्ये कोरोनाची फक्त 100 प्रकरणे आढळली आहेत. सिंगापूरनेही जानेवारी महिन्यापासून चीनच्या प्रवासास मनाई केली होती. तसेच कोरोनाची लक्षणे आढळलेल्या संशियतांना 14 दिवस आयसोलेट वॉर्डमध्ये देखरेखीखाली राहणे सक्तीचे केले होते. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव सिंगापूरमध्ये काही दिवस शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली होती. तैवान आणि सिंगापूरने कोरोनाचा धोका ओळखून तातडीने कारवाई केल्याने तेथे कोरोनाचे संक्रमण रोखण्यात आले. मात्र, अमेरिकासारखा देशही तातडीने उपाययोजना करण्यास अपयशी ठरल्याचे दिसत आहे.




























































