बेकायदा वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई करा – अब्दुल सत्तार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी, बसणी आणि मिर्‍या येथील बेकायदेशीर उत्खनन केलेली वाळू जप्त केली. मात्र,अजून आरोपी का पकडले नाहीत, ही वाळू कोण उत्खनन करते हे तलाठ्यांना विचारा आणि कारवाई करा, अशा सूचना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रांताधिकाऱ्यांना रत्नागिरीत दिल्या. बेकायदा चिरेखाण आणि वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा आणि जे अधिकारी कारवाई करत नाहीत त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, असा इशारा सत्तार यांनी दिला.

चिरेखाण उत्खननाला आपण लवकरच परवानगी देणार आहोत, असे सत्तार यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत सांगितले. अवैध चिरेउत्खनन, वाळू उत्खनन सुरु असल्याची तक्रार पत्रकारांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कानावर घातली. यावर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त करत प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी यांना कारवाई का होत नाही याबाबत विचारणा केली.

काही दिवसांपूर्वी काळबादेवी, बसणी आणि मिर्‍या या तीन ठिकाणी मिळून 138 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या तीन ठिकाणी वाळूचे ढिगारे केले होते. ते आम्ही जप्त केले, असे प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी यांनी सांगितले. मात्र, तो वाळूचा उपसा कोणी केला होता, त्यांचे नाव पुढे आले नाही. याबाबत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली.

हे उत्खनन कोणी केले हे तेथील ग्रामसेवकांना, तलाठयांना विचारा, हे उत्खनन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असे त्यांनी सांगितले. शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. याठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकर्‍यांना शासनाकडून मदत देण्यात येणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, आमदार राजन साळवी, जि़.प़.अध्यक्ष रोहन बने उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबतची माहिती सत्तार यांना कळताच त्यांनी बेकायदेशीर उत्खननावर कारवाई झालीच पाहीजे असे सांगितले. जिल्ह्यामध्ये संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड, रत्नागिरीतील कोतवडे, काळबादेवी, मिर्‍या या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उत्खनन केले जाते. बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई करण्याच्या सूचना सत्तार यांनी दिल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.