राष्ट्रवादीचा फॉर्मुला काँग्रेसला अमान्य,काँग्रेसचे दबावतंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत जागा वाटपाबाबत फिफ्टी-फिफ्टी फॉर्मुल्यावर एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसनेही स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याचे ठरवले आहे.

लोकसभा निवड़णुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांची महाआघाडी उभारण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.भाजपच्या विरोधातील मतांचे विभाजन टाळले तर भाजपचा पराभव शक्य असल्याचे उत्तर प्रदेश, कर्नाटकातील पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधातील समविचारी पक्षाला सोबत घेऊन महाआघाडी उभारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन  निवडणूक लढण्याचा प्रयत्न आहे. महाआघाडीतील जागा वाटपाच्या दृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच इतर समविचारी पक्षांच्या बैठका सुरु आहेत. पण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या 48 जागांपैकी 24 जागांवर आग्रह धरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 24 जागांचा आग्रह धरताना 2014च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आधार घेतला आहे.लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार तर काँग्रेसच्या दोन जागा आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले.

जागा वाटपाचे घोडे अडले

मागील निवडणुकीत काँग्रेसने 26 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 22 जागा लढवल्या होत्या. त्यामुळे यावेळी मागील निवडणुकीतील जागा वाटपाचे सूत्र कायम राहिल अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस फिफ्टी-फिफ्टीच्या जागा वाटपाच्या फॉर्मुल्यावर ठाम आहे. पण काँग्रेसला हा फॉर्मुल मान्य नसल्याने जागा वाटपाचे घोडे अडले आहे. राष्ट्रवादीचा फिफ्टीचा फॉर्मुला मान्य नसल्याने काँग्रेसने राष्ट्रवादीवर दबाव वाढवण्यास सुरवात केली आहे.

17 नोव्हेंबरला कोकणात आढावा

त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात आढावा बैठक घेणार आहे.  15 ते 17 नोव्हेंबर या काळात काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे 48 मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 17 नोव्हेंबरला काँग्रेसतर्फे कोकण विभागात आढावा घेण्यात येणार आहे.