
शिवसेना मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करणारे दोन मुख्य फरार आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंग उर्फ पपलू हे दोघे प्रयागराजमधील व्हीव्हीआयपी घाटावर लपून बसले होते. ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथकाने येथे धडक देत दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. आरोपींना उद्या दुपारपर्यंत ठाण्यात आणण्यात येणार असून सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंग उर्फ पपलू हे दोन्ही आरोपी मूळ उत्तर प्रदेशचे राहणारे असल्याने त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या मित्र मंडळींकडे चौकशी केली जात होती. या दोघांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या सीमेवर होते. या आरोपींच्या नातेवाईकांकडून काही माहिती मिळाल्यानंतर त्यांना प्रयागराजमध्ये नैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या व्हीव्हीआयपी घाटावरून खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले, असे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
पूर्णेकर यांची हत्या केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून काही मिनिटांतच पसार झाले होते. त्यानंतर समता नगर येथे दुचाकी पार्क करून अल्टो कारने त्यांनी अलिबागच्या दिशेने पळ काढला. दरम्यान, निखिल यादव आणि नीतेश पवार यांना २ ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास कर्नाळा येथून अटक करण्यात आली.
पिस्तूल, मोबाईल जप्त
या गुन्ह्यातील दोन आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि हेल्मेटधारी दुसरा अनोळखी व्यक्ती अमित सिंग हे पोलिसांना गुंगारा देत होते. तर पप्या शिंदे याने मारेकऱ्यांना घटनास्थळावरून पसार होण्यासाठी कारची व्यवस्था केल्याचा दावा पोलिसांनी केला. कॉल डिटेल रेकॉर्डनुसार पप्या शिंदे हा इतर आरोपींच्या संपर्कात सुमारे १५० वेळा असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान नीतेश पवार याने वापरलेले पिस्तूल आणि निखिल यादवचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.






























































