‘या’ उमेदवाराकडे आहे 1.76 लाख कोटींची रोकड, उमेदवारी अर्जात केले नमूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांच्या अर्जातून त्यांच्या संपत्तीची देखील पोलखोल होत आहे. अशातच तमिळनाडूतून अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या एका उमेदवाराकडे चक्क 1.76 लाख कोटींची रोकड असल्याचे समोर आले आहे. तसे त्या उमेदवाराने त्याच्या अर्जात नमूद केले आहे. आता ही रक्कम किती खरी किती खोटी ते त्यालाच माहित.

जे. मोहनराज (67) असे त्या उमेदवाराचे नाव असून त्याने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे 1.76 लाखांची रोकड आहे. तसेच त्याच्यावर जागतिक बँकेचे 4 लाख कोटींचे कर्ज आहे. मोहनराज हे पेराम्बुर या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

याआधी 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोहनराज यांनी त्यांची संपत्ती 1,977 कोटी जाहीर केली होती. याविषयी सांगताना त्यांनी एक मजेशीर पण उपरोधिक अशी प्रतिक्रीया दिली होती. ते म्हणालेले की, जर देशातील सर्व नेत्यांनी जाहीर केलेली संपत्ती खरी असेल तर माझी संपत्ती देखील खरी आहे.