
श्रीलंकेत विध्वंस केल्यानंतर दितवाह चक्रीवादळाने रविवारी तामीळनाडू आणि पुडुच्चेरीमध्ये थैमान घातले. चक्रीवादळामुळे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तामीळनाडूत 3 जणांचा मृत्यू झाला असून मोठय़ा प्रमाणावर पशुधनाचेही नुकसान झाले आहे.
तामीळनाडूचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री के. रामचंद्रन यांनी सांगितले की, 234 घरांचे नुकसान झाले असून 149 पशूंचा मृत्यू झाला आहे. सुमारे 57 हजार हेक्टर शेतजमीन पाण्यात बुडाली आहे. चक्रीवादळ धडकल्यानंतर आणखी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे एनडीआरएफ आणि एसडीआरएफची 28 पथके तैनात करण्यात आली आहेत. तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकल्यानंतर दितवाह चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने सरकणार असून त्याचे रूपांतर कमी दाबाच्या पट्टय़ामध्ये होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
श्रीलंकेत 334 जणांचा मृत्यू
दितवाह चक्रीवादळाने तीन दिवस श्रीलंकेत थैमान घातले. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे श्रीलंकेत आतापर्यंत 334 जणांचा मृत्यू झाला असून 370 जण बेपत्ता असल्याची माहिती श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन पेंद्राने दिली. चक्रीवादळामुळे श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत अडकलेल्या 400 हिंदुस्थानी नागरिकांना हवाई दलाच्या मदतीने परत आणण्यात आले.





























































