
अनेकदा फसवणुकीचे अनेक विचित्र प्रकार उघड होतात. असाच एक प्रकार तामिळनाडू येथे घडला आहे. येथे तीन जणांनी मिळून भारतीय स्टेट बँकेची बनावट शाखा सुरू केली. गंभीर म्हणजे एक दोन दिवस नव्हे तर तीन महिने ही शाखा सुरू होती. तामिळनाडू पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
तामिळनाडूच्या पनरुती येथे तीन जणांनी मिळून बनावट शाखा सुरू केली होती. त्यांचा मुख्य सूत्रधार कमल बाबू हा आहे. बाबू याचे आईवडील बँक कर्मचारी होते. त्याचे वडील 10 वर्षांपूर्वी निधन पावले. त्याची आई दोन वर्षांपूर्वीच बँकेतून निवृत्त झाली होती. तर या आरोपीपैकी एकाचा येथेच छापखाना असून तिसरा आरोपी रबरी स्टॅम्प छापतो.
यातील छापखाना असलेल्या आरोपीने नकली चलन आणि अन्य नकली दस्तऐवज छापले आणि तिसऱ्या आरोपीने दुकानातून बँकेच्या हुबेहुब स्टॅम्पची नक्कल तयार केली होती. सुमारे तीन महिने ही शाखा सुरू होती. पण, दुर्दैवाने एका खातेदाराला या शाखेविषयी कळलं. त्याने अस्सल शाखेच्या व्यवस्थापकाकडे याची तक्रार केली. नवीन शाखेविषयी कोणतीही नोंद नसल्याने एसबीआयचे झोनल अधिकारीही अचंबित झाले.
या प्रकाराची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शाखेवर धाड टाकली. ही शाखा हुबेहूब अस्सल शाखेसारखीच दिसत होती. पोलिसांनी धाड टाकून ही शाखा बंद करवली आणि या तीन जणांना अटक केली. सुदैवाने या शाखेतून कुठलाही व्यवहार झालेला नाही. तरीही ऑनलाईन पद्धतीने काही फसवणूक करण्यात आली आहे का, याची तपासणी सुरू आहे.































































