चहावाल्याचा प्रताप, सीआयडी अधिकारी असल्याचं सांगून अनेकांना लुटलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन, मुंबई

डी.बी.मार्ग पोलिसांनी स्वत:ला सीआयडी अधिकारी असल्याचं सांगत अनेकांना लुटणाऱ्या चहावाल्याला अटक केली आहे. मोहम्मद शेख असं या आरोपीचं नाव असून तो ग्रँट रोड भागात असलेल्या वेश्यांच्या अड्ड्यावर लक्ष ठेवून असायचा. आणि वेश्यांकडे येणाऱ्यांना आपण पोलीस असल्याचं सांगून त्यांच्याकडून पैसे उकळायचा.

चहा विकण्याच्या बहाण्याने मोहम्मद वेश्यांच्या अड्ड्यांवर सहजपणे लक्ष ठेवू शकत होता. नियमित येणारी माणसं आणि कधीतरी येणारी माणसं कोण हे त्याला चांगलं कळायला लागलं होतं. मोहम्महद सावज हेरायचा आणि त्याच्या जवळ जाऊन त्याची कॉलर पकडायचा. मी सीआयडी अधिकारी आहे आणि माझ्यावर इथल्या भागावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे असं सांगून मोहम्मद सावजाला घाबरवायचा. तू इथे आला आहे हे कोणाला कळू द्यायचं नसेल आणि पोलिसांच्या भागनड मागे लावून घ्यायची नसेल तर मला पैसे दे असं सांगून तो सावजाकडून शक्य होतील तितके पैसे उकळायचा.

गुरुवारी मोहम्मदच्या एका सावजाने मित्राच्या मदतीने डीबी मार्ग पोलीस स्थानक गाठलं आणि त्याच्यासोबत झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. मोहम्मदने त्याला 2 हजार  रुपये मागितले होते, इतके पैसे नसल्याने 1200 रूपये देत या व्यक्तीने सुटका करून घेतली होती. या माणसाने तक्रार करताच पोलिसांचे एक पथक ग्रँड रोड भागात तैनात करण्यात आली. या पथकाने मोहम्मदला ताब्यात घेतला आणि चौकशी केली.  चौकशीमध्ये मोहम्मदने गुन्हा कबूल केला, ज्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.