
राज्यातील विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिरंगाई होत आहे. अनुदानाचा प्रश्न सोडविला जात नाही, यामुळे असंख्य शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून राष्ट्रीय शिक्षक दिन हा काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. काळ्या फिती लावून शिक्षकांनी राज्यभरात सरकार आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
शिक्षकांनी काळ्या फिती लावून राज्यात जिल्हा शिक्षण अधिकारी व उपासंचालक कार्यालय या ठिकाणी आंदोलन केले. तर मुंबईत शिक्षण निरीक्षक कार्यालय पश्चिम विभाग मुंबई येथे राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मुंबई विभागाचे अध्यक्ष संजय डावरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आहे. यावेळी शिक्षकांच्या विविध मागण्यांची निवेदनेही शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली.
राज्यात विनाअनुदानित शिक्षकांची मात्र गेल्या 20-22 वर्षांपासून परवड सुरूच आहे. अनुदान जाहीर करूनही ते वेळेत दिले जात नाही. त्यामुळे असंख्य विनाअनुदानित शिक्षकांनी या वेठबिगारीला पंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे तर हजारो शिक्षक बिनपगारी सेवानिवृत्त होत आहेत. अशा स्थितीत सरकारकडून साजरा करण्यात आलेल्या शिक्षक दिनावर आम्ही बहिष्कार टाकत काळा दिवस साजरा केला असल्याचे डावरे यांनी सांगितले.



























































