
कोरोना काळात शाळा, कॉलेज बंद असताना विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून शिक्षण देणे हे राष्ट्रीय कार्य असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे शिक्षक स्वेच्छेने शाळेत येण्यास तयार आहेत, त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.
एरव्ही निवडणुकीची कामे असो किंवा जनगणना या राष्ट्रीय कार्यासह शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठीही शिक्षकांना अनेक लोकांच्या संपका&त राहून लहानमोठय़ा, स्वच्छ, गलिच्छ वस्त्यांमधून फिरावे लागते. या कामांसाठी शिक्षकांनाच प्राधान्य दिले जाते. मग कोरोनाच्या परिस्थितीत शिक्षकांवर घरी राहण्याची जबरदस्ती का, असा सवालही काही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
लॉकडाऊनच्या निर्बंधातही अनधिकृत फेरीवाले रस्त्यावर फिरून कोरोनाचा प्रसार करण्यास जबाबदार असून शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱया शिक्षकांना या कठीण काळात अत्यावश्यक सेवेकरी म्हणून गणले जात नाही, याविषयी शिक्षकवर्गात नाराजी आहे. शालेय पोषण आहाराचे वाटप, विद्यार्थ्यांचा अभ्यास, पालकांशी संपर्क, शाळेची स्वच्छता, शिक्षण विभागातून मागवलेली माहिती पुरविणे ही कामे शिक्षक घरी बसून कशी करणार, त्यासाठी त्यांना शाळेत येणे आवश्यक असून शिक्षणाला कोरोना काळात अतिमहत्त्वाचा दर्जा देऊन शिक्षकांना शाळेत येण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे.





























































