दसऱ्याआधीच विजयादशमी, विराट सेनेचे कसोटी मालिकेत निर्भेळ यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

पहिल्या डावात तीनशेहून अधिक धावा करून पाहुण्या वेस्ट इंडीज संघाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार केला होता. मात्र, दुसऱ्या डावात विंडीजच्या फलंदाजांनी हिंदुस्थानी गोलंदाजीपुढे सपशेल शरणागती पत्करली अन् त्यांचा डाव अवघ्या 46.1 षटकांत केवळ 127 धावसंख्येवर गडगडला. विराट कोहलीच्या सेनेने विजयासाठी मिळालेले 72 धावांचे माफक लक्ष्य 16.1 षटकांत एकही फलंदाज न गमावता ओलांडून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. याचबरोबर हिंदुस्थानने दोन सामन्यांची ही मालिका 2-0 फरकाने जिंकून निर्भेळ यश संपादन केले.

मुंबईकर पृथ्वी शॉने पदापर्णाच्या कसोटी मालिकेत मालिकाविराचा बहुमान मिळविला, तर वेगवान गोलंदाज उमेश यादव सामन्याचा मानकरी ठरला. हिंदुस्थानने मायदेशात सलग दहावी कसोटी मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी करत कसोटी मालिका विजयाची विजयादशमी दसऱयाआधीच साजरी केली.

हिंदुस्थानला पहिल्या डावात 56 धावांची आघाडी
हिंदुस्थानने दुसऱ्या दिवसाच्या 4 बाद 308 धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरूवात केली. मात्र, त्यांच्या उर्वरित 6 फलंदाजांना या धावसंख्येत केवळ 59 धावांचीच भर घालता आली. शनिवारी 85 धावांवर नाबाद परतलेला रिषभ पंत व 75 धावांवर नाबाद असलेल्या अजिंक्य रहाणेला आज शतकी मजल मारता आली नाही. रहाणे 80, तर पंत 92 धावांवर बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विनने 35 धावांची खेळी केली म्हणून हिंदुस्थानला पहिल्या डावात 56 धावांची आघाडी घेता आली. विंडीजकडून कर्णधार जेसन व्होल्डरने 5 फलंदाज बाद केले, तर शानोन गॅब्रियलने 3, तर जोमेल वॅरिकनने 2 बळी टिपले.

पाहुण्यांचा दुसरा डाव गडगडला
पहिल्या डावात समाधानकारक धावसंख्या उभारणारा विंडीजचा संघ दुसऱया डावातही चांगल्या धावा करून सामन्यात रंगत निर्माण करतील अशी आशा होती. मात्र, हिंदुस्थानी गोलंदाजीपुढे त्यांचा डाव 127 धावांत गडगडला. उमेश यादवचा तिखट मारा आणि रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन व कुलदीप यादव या फिरकी त्रिकुटापुढे विंडीजच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. पाहुण्यांच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. उमेश यादवने दुसऱयाच चेंडूवर क्रेग ब्रेथकेटला शुन्यावर यष्टीमागे पंतकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला सनसनटी सुरूवात करून दिली. त्यानंतर धावफलकावर 6 धावा लागल्या असताना अश्विनने दुसरा आघाडीवर कायरान पॉवेललाही भोपळाही फोडू न देता रहाणेकरवी झेलबाद केले.

पृथ्वीच्या खेळावर सचिन, लारा आणि सेहवाग यांच्या खेळाची झाक
पृथ्वी शॉ खरेच टॅलेंटेड फलंदाज आहे. त्याच्या खेळावर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर , विंडीजचा ग्रेट फलंदाज ब्रायन लारा आणि तडाखेबाज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्या खेळाची झाक दिसून येते. या तीन महान फलंदाजांच्या कौशल्यपूर्ण आणि धडाकेबाज खेळाचे मिश्रण असलेला पृथ्वी भविष्यात जगातील महान फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसेल असा मला विश्वास आहे अशी स्तुतिसुमने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी पृथ्वीवर उधळली. पृथ्वी वयाच्या आठव्या वर्षांपासूनच अथक परिश्रम घेतोय. त्याने आपले डोके शांत ठेवले आणि पाय कायम जमिनीवर ठेवले तर तो भविष्यात निश्चितच महान क्रिकेटर बनेल यात शंकाच नाही ,असेही शास्त्राी पुढे म्हणाले.

हिंदुस्थाकडून विजयाची औपचारिकता
हिंदुस्थानला विजयासाठी केवळ 72 धावांचे लक्ष्य मिळाले. पृथ्वी शॉ (नाबाद 33) व लोकेश राहुल (नाबाद 33) यांनी 16.1 षटकांत नाबाद 75 धावा करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. पृथ्वी शॉने विजयी चौकार लगावला.
संक्षिप्त धावफलक –
वेस्ट इंडीज पहिला डाव – 311 धावा.
हिंदुस्थान पहिला डाव – 367 धावा.
वेस्ट इंडीज दुसरा डाव – 46.1 षटकांत 127 धावा.
हिंदुस्थान दुसरा डाव – 16.1 षटकांत बिनबाद 75 धावा.

summary- team india won over west indies in test series