
मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पेंटहाऊसच्या व्यावसायिक वापरावरून सुरू असलेल्या वादातून एका व्यक्तीने भरधाव कार रहिवाशांवर चढवली. यात शम्पा पाठक नावाच्या तरुण महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री ही घटना घडली असून याचा अंगावर काटा येणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सागर टाऊनशिपमधील दोन पेंटहाऊसचा वापर ऑनलाइन ॲप्लिकेशनद्वारे ‘शॉर्ट टर्म रेंटल्स’साठी केला जात होता. या व्यावसायिक वापराला सोसायटीतील रहिवाशांचा तीव्र विरोध होता. बुधवारी रात्री याच मुद्द्यावरून रहिवासी आणि पेंटहाऊस मालक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. वादाचे पर्यावसान हाणामारीत होत असतानाच आरोपी मोहित चौधरी याने संतापाच्या भरात आपली कार थेट रहिवाशांवर चढवली. यावेळी त्याचे वडील कुलदीप चौधरी हे देखील कारमध्ये उपस्थित होते. भरधाव कार अंगावरून गेल्याने शम्पा पाठक नावाच्या महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पेंटहाऊसच्या वादातून एका व्यक्तीने भरधाव कार रहिवाशांवर चढवली. यात महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. pic.twitter.com/qDnwdH50st
— Saamana Online (@SaamanaOnline) March 26, 2026
दरम्यान, या घटनेत जीव गमावलेल्या शम्पा पाठक या व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होत्या. त्या अवघ्या 13 दिवसांपूर्वीच पती सौरभ आणि दोन मुलांसह या सोसायटीत राहायला आल्या होत्या. सुखी संसाराचे स्वप्न घेऊन नवीन घरात आलेल्या शम्पा यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा थरार सोसायटीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले आहे. मोहित चौधरी आणि त्याचे वडील कुलदीप चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमरेंद्र सिंह यांनी दिली.



























































