
>> प्रवीण धोपट
ट्रेडिंग करणे म्हणजे खरेदी आणि विक्री करणे असले तरी त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. इंट्राडे ट्रेडिंगसाठी कळत नकळत एखादे टेक्निक अंगवळणी पडते. एकच गोष्ट पुनः पुन्हा करून ट्रेडरची नजर सेट होते आणि तीच त्याची स्ट्रटेजी बनते. काही ट्रेडर सोयीनुसार दोन टेक्निक एकत्र करूनही ट्रेडिंग करणे पसंत करतात. इंट्राडे ट्रेडिंगची काही महत्त्वाची टेक्निक्स आहेत, ती याप्रमाणे…
स्काल्पिंग – इंट्राडे ट्रेडिंगमध्ये स्काल्पिंगचे महत्त्व खूप आहे. या स्ट्रटेजीमध्ये ट्रेडर छोटय़ा प्राईस मुव्हमेंटच्या दरम्यान छोटे छोटे प्रॉफिट घेत असतो. कमीत कमी प्रॉफिट, पण जास्तीत जास्त ट्रेड हा या स्ट्रटेजीचा पाया असतो.
मुव्हमेंट ट्रेडिंग – प्रवाहाबरोबर राहणे हा या स्ट्रटेजीचा पाया असतो. यात जर प्राईस वर जात असेल तर खरेदी करणे आणि जर प्राईस खाली जाण्याचा कोणत्याही प्रकारचा सिग्नल असेल तर विक्री करणे अभिप्रेत असते. अशा प्रकारचे ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी ट्रेडरचा टेक्निकल अॅनालिसीसचा अभ्यास असणे गरजेचे असते.
न्यूज बेस ट्रेडिंग – एखादी बातमी, कंपनीच्या नफा-नुकसानीचा रिपोर्टस् आणि इतर मार्केट मुव्हिंग इव्हेंट हा न्यूज बेस ट्रेडिंगचा पाया असतो. ट्रेडर या विशिष्ट बातमीचा संभाव्य परिणाम काय होईल याचा अंदाज बांधत असतो आणि त्यानुसार आपली ट्रेडिंगची स्ट्रटेजी ठरवत असतो.
टेक्निकल अॅनालिसीस – यामध्ये ट्रेडरचा प्राईस चार्टचा अभ्यास असणे अपेक्षित असतो. ट्रेडर वेगवेगळे इंडिकेटर वापरून खरेदी-विक्रीच्या संधी शोधत असतो. इंडिकेटरमुळे फिल्टरेशन सोपे होते. वेळ वाचतो.
ब्रेकआऊट ट्रेडिंग स्ट्रटेजी – मार्केटची किंवा शेअरची प्राईस एका रेंजमध्ये फिरत असते. अशा वेळी ट्रेडरला आपण कोणता निर्णय घ्यावा हे कळत नाही, पण मार्केट जेव्हा त्या विशिष्ट प्राईसची रेंज तोडून बाहेर जाते तेव्हा खरेदी-विक्रीच्या संधी निर्माण होत असतात. काही ट्रेडर अशा ब्रेकआऊटची वाट पाहत असतात.
रेंज बाऊंड ट्रेडिंग – मार्केट किंवा शेअरची प्राईस जेव्हा एखाद्या विशिष्ट प्राईस रेंजमध्ये फिरत असते तेव्हा ते किती काळ या रेंजमध्ये राहील याचा अंदाज नसतो, पण इथेच ट्रेडरसाठी खरेदी-विक्रीची संधीही तयार होत असते. ट्रेडर त्या ठरावीक रेंजच्या बॉटमला खरेदी करत असतो आणि त्या रेंजच्या टॉपला विक्री करत असतो.
गॅप ट्रेडिंग – मार्केट कोणत्या प्राईसला ओपन होईल हे सांगता येत नाही. बहुतांश वेळ ते कालच्या क्लोजिंगला ओपन होते, पण काही वेळेला मार्केट गॅपने ओपन होते. हा गॅप खाली किंवा वर कुठेही तयार होऊ शकतो. ज्याला गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपनिंग असेही म्हटले जाते. ज्या दिवशी अशी घटना घडते, त्या वेळी इंट्राडे ट्रेडरसाठी खरेदी-विक्रीची संधी तयार होत असते. अर्थातच ही काही जुजबी टेक्निक आहेत. या टेक्निक्सचा रिझल्ट आपला रिसर्च, आपली रिस्क मॅनेजमेंट आणि आपला ट्रेडिंगचा प्लॅन यावर अवलंबून असतो.
(लेखक दीपंकर फिनपॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)





























































