
सामना ऑनलाईन । मुरबाड
तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतानाच त्याची झळ आता जंगलातील प्राण्यांनाही बसू लागली आहे. प्यायला पाणी व अन्न मिळत नसल्याने पशुपक्षी आता मानवी वस्तीत शिरू लागले असून एका भुकेल्या वाघाने डोंगरवाडीत घुसखोरी करीत स्थानिक शेतकऱयांच्या तीन शेळ्या व दोन कुत्रे फस्त केले. या वाघाची प्रचंड दहशत पसरली असून कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला होईल या भीतीने अनेक आदिवासी घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत.
मुरबाड तालुक्यातील अनेक गावपाडय़ांवर हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भीमाशंकर अभयारण्यात असलेल्या गाव-पाडय़ांमध्ये यापूर्वीही वाघाने हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून येथे मोठय़ा प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जंगलात वृक्षतोड झाल्याने प्राण्यांना अन्न मिळत नाही. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून भुकेलेला वाघ वाडय़ा-वस्त्यांवर फिरत आहे. डोंगरवाडीत राहणाऱया जयवंत वाघ यांची एक बकरी व कुंदा मेंगाळ यांच्या दोन बकऱया वाघाने खाऊन टाकल्या. तर विनायक धर्मा याच्याकडे असलेल्या कुत्र्यांवरही हल्ला करीत त्यांना फस्त केले.
बेसुमार जंगलतोड आणि आगी लावल्या
मुरबाडमधील भीमाशंकर अभयारण्यात माफियांनी बेसुमार जंगलतोड केल्याने वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात आगीही लावण्यात आल्या. त्यामुळे पक्षी, प्राणी यांचे जीवनच संकटात आले आहे. दोन वर्षांपूर्वी सोनावळे-सोनगाव या गावातील बारकू भोईर या ग्रामस्थावर वाघाने झडप घालून त्याला ठार मारले. डोंगरवाडीत गेल्या दोन दिवसांत वाघाने कुत्रे व शेळ्या फस्त केल्याने सोनावळे गावातील आठवणी जाग्या झाल्या आहेत.
बंदोबस्त करण्याची वनखात्याकडे मागणी
डोंगरवाडी व परिसरात फिरत असलेल्या वाघामुळे येथील रहिवाशांची रात्रीची झोपच उडाली आहे. कोणत्याही क्षणी वाघ येईल आणि आपल्यावर झडप घालील या भीतीने लहान मुले व महिला घराबाहेर पडायला घाबरत असून वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी डोंगरवाडीतील ग्रामस्थांनी वनखात्याकडे केली आहे. मात्र अद्यापि त्याची दखल घेण्यात आलेली नाही.



























































