रमजाननंतर कश्मीरात दहशतवाद्यांची भरती जोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
terriorist
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरातील दहशतवादी कारवाया रोखण्यात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अपयश आल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रमजाननंतर कश्मीर खोरे दहशतवाद्यांचे भरती केंद्रच बनले आहे. मोठय़ा प्रमाणावर तरुण हे दहशतवादी बनत आहेत. दहशतवादी संघटनांमध्ये जिहादींची संख्या जास्त आणि बंदुका कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. कश्मीर खोऱ्यातील ही स्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.

जम्मू-कश्मीर मल्टी एजन्सी सेंटरने दिलेली आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार रमजान महिन्यात केंद्राने जारी केलेली एकतर्फी संचारबंदी उठल्यानंतर शोपियाँ, पुलवामा, अनंतनाग आणि कुलगाम या दक्षिण कश्मिरातील जिल्हय़ांमधील तब्बल २७ तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले. एप्रिलमध्ये सर्वाधिक २८ जण दहशतवादी बनले होते. दक्षिण कश्मीर हे दहशतवाद्यांचे भरती केंद्रच बनले असून या वर्षी सहा महिन्यांत तब्बल ८२ जण हिजबूल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदमध्ये सामील झाल्याची धक्कादायक माहिती आहे. यात रमजाननंतर मोठय़ा प्रमाणावर तरुण दहशतवादी बनले आहेत. दहशतवादी संघटनांकडे बंदुका कमी आणि जिहादी जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे दहशतवाद्यांकडून पोलीस आणि सुरक्षा जवानांकडील बंदुका पळविल्या जात आहेत.

३० जून २०१८पर्यंत दहशतवाद्यांची भरती
जिल्हा       दहशतवादी
अनंतनाग      १२
शोपियाँ        २१
कुलगाम       १६
पुलवामा       २०
बारामुल्ला     ०४
कुपवाडा      ०३
श्रीनगर        ०२
बांदीपोरा      ०१

दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर भरती वाढते!
सुरक्षा जवानांकडून दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्याला जेव्हा कंठस्नान घातले जाते त्या वेळी दहशतवाद्याला दफन करण्यासाठी जनाजे काढले जातात. हजारो लोक या वेळी सामील होतात. त्या वेळी तरुणांची माथी भडकवणारी भाषणे देऊन चिथवले जाते. प्रत्येक वेळी दहशतवाद्याचा खात्मा केल्यानंतर हे दृश्य कश्मीर खोऱ्यात दिसते. येथूनच दहशतवादी भरतीची प्रक्रिया सुरू होते. ही परिस्थिती चिंताजनक आहे, अशी माहिती दक्षिण कश्मिरातील एका लष्करी अधिकाऱ्याने दिली.