मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागात कर्मचारी भरती घोटाळा समोर आला आहे. आकृतिबंध डावलून ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या 10 कंत्राटी परिचारिकांना पालिका सेवेत कायम करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांनी आपले हात ‘ओले’ करून घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात उघडपणे केली जात आहे. याच प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य पद्धतीने केलेली भरती रद्द करण्याची मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वी इंदिरा गांधी रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागात आकृतिबंधात एकच पद रिक्त असताना दोघांचीनियुक्ती केली होती. यात शासनाचीदेखील फसवणूक केल्याचे समोर येताच शासनाने तत्काळ त्याचा खुलासा करण्याबाबतचे पत्र पालिकेला धाडले. यानंतर आता नव्याने ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या 10 परिचारिकांना सेवेत कायम केल्याचा घोटाळा समोर आला आहे. या अधिपरिचारिकांनी आपल्याला पालिका सेवेत कायम करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. हा दावा मागे घेण्याच्या अटीवर त्यांना सेवेत कायम करण्याचा मार्ग प्रशासनाकडून शोधण्यात आला. त्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार करून कोणतीही भरती प्रक्रिया न राबवता परस्पर त्यांना सेवेत कायम केल्याचा आदेश 31 जानेवारी रोजी काढण्यात आला.
नियमांची ऐशीतैशी
भरती झालेल्या काही परिचारिकांनी राज्याऐवजी परराज्यातून नर्सिंगचा कोर्स पूर्ण केल्याचा दाखला जोडला असल्याचे समोर आले असून त्याची पडताळणी करण्याची तसदी प्रशासनाकडून घेतली नाही. शिवाय आकृतिबंधात मंजूर असलेली आरक्षण निहाय पदे भरली नाहीत. 10 अधिपरिचारिकांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेताना अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी दोनच पदे राखीव असताना तब्बल 4 जणांची नियुक्ती केल्याचा नियमबाह्य प्रकार उघडकीस आला आहे.