
सामना ऑनलाईन । ठाणे
महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर महिलांचे वर्चस्व निर्माण झाले असून नऊपैकी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांना आता गती मिळणार आहे. राष्ट्रवादीचे दोन तर भाजपच्या एका नगरसेवकाला प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. सर्वच पक्षांनी महिलांना प्राधान्य दिल्याने प्रभाग समित्यांची ‘लेडीज स्पेशल’ सुसाट झाली आहे.
नऊ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी पालिका मुख्यालयात अर्ज दाखल करण्यात आले. ही निवडणूक बिनविरोध झाली असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने निवडणूक घेण्यात आली, पण प्रत्येक प्रभागांमध्ये एकाच उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पालिकेचे सचिव अशोक बुरपुल्ले यांच्याकडे सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृहनेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के आदी उपस्थित होते.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षांची नावे – नम्रता पमनानी (कोपरी), पद्मा भगत (माजिवडा-मानपाडा), दीपाली भगत (दिवा), निर्मला कणसे (लोकमान्य-सावरकरनगर), शिल्पा वाघ (वागळे इस्टेट), नरेंद्र सुरकर (वर्तकनगर). भाजप-दीपा गावंड (उथळसर). राष्ट्रवादी-जितेंद्र पाटील (कळवा), अशरीन राऊत (मुंब्रा).




























































