गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सव सण अवघे काही दिवसांवर आले असतानाही कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे वैसे आहेत. सणापूर्वी खड्डे बुजवले जात असल्याचे दाखवण्यासाठी पालिकेकडून थुकपट्टी केली जात आहे. ठेकेदारांकडून डांबरऐवजी केवळ खडी व मातीचा भराव टाकून खड्डे बुजवण्याचे पाप केले जात आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे जनतेच्या करोडो रुपयांची लूट होत आहे.
जून, जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली शहरातील रस्ते खड्यात गेले आहेत. रस्ते उखडल्यामुळे वाहतूककोंडी होत असून अपघातही वाढले आहेत. प्रत्येक पावसाळ्यात हीच स्थिती असतानाही पालिका काहीच बोध घेत नसल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. खड्यांवरून पालिका प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागत असल्याने काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी शहर अभियंता व प्रभाग अधिकाऱ्यांसह खड्यांची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी खड्डे योग्य पद्धतीने न भरल्यास कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र हा इशारा कंत्राटदाराने गांभीर्याने घेतला नसल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातील प्रमुख मार्ग खड्ड्यात गेले आहेत. कंत्राटदार डांबरीकरण करण्याऐवजी माती व खडी टाकून खड्डे भरत असून वाहनांच्या वर्दळीमुळे अवघ्या काही तासांत ही खडी इतरत्र पसरून खड्डे उघडे पडत आहेत. माती रस्त्यावर येत असल्याने पाऊस पडताच दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. कंत्राटदार मनमानी पद्धतीने खड्डे भरण्याचे काम करत आहेत. एका रस्त्यावरील सर्व खड्डे न भरता अर्धवट कामे करण्यात येत आहेत.
बोलाची कढी.. बोलाचा भात
पालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करू असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन बोलाची कढी.. बोलाचा भात ठरले आहे. ठेकेदार केवळ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके खड्डे डांबरने भरत आहेत. उर्वरित खड्डे खडी आणि माती टाकून भरण्यात येत आहेत.