
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 35 जणांचा मृत्यूनं खळबळ उडाली आहे. केवळ नांदेडच नाही तर राज्यातील अन्य भागातील शासकीय रुग्णालयं आणि एकूणच आरोग्य यंत्रणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण देखील तापलं आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात माहिती देताना पुरेसा औषध साठा आणि मनुष्यबळ असतानाही देखील ही घटना घडल्याचं म्हंटलं होतं. मात्र आता वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीनंतर सरकारमध्ये गोंधळ असल्याचं पाहायला मिळत आहे.
हसन मुश्रीफ रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुश्रीफ यांनी नांदेडमधील या रुग्णालयाची परिस्थिती खरंच वाईट असल्याची कबुली दिली आहे.
‘नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिस्थिती खरोखरच तशी वाईटच आहे. हे 500 बेडचं रुग्णालय आहे. पण येथे रोज 800 ते 1000 रुग्ण येतात आणि 400 ते 500 रुग्ण हे खाली झोपतात’, अशी धक्कादायक माहिती मुश्रीफ यांनी दिली.
पुढे म्हणाले की, ‘अवस्था अशी आहे की, येथे एनएमसी (नॅशनल मेडिकल कमीशन)च्या नॉर्मप्रणाणे आठ लहान मुलांच्या पेट्या आहेत, त्यात जास्तीत जास्त 16 मुलं ठेवता येतील. काल तिथं 68 लहान मुलं होती, एका पेटीत चार मुलं झोपवली होती’.
मुश्रीफ यांनी स्वत:ही परिस्थिती सांगितल्यानं सरकारचं आरोग्य सुविधांकडे किती दुर्लक्षं होत आहे हे स्पष्ट दिसत आहे. यावेळी त्यांनी मुलभूत सुविधा वाढवण्याची गरज असल्याचंही जोर देऊन सांगितलं.
रुग्णालयात अस्वच्छता असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. ‘इथे अस्वच्छता आहे, दुर्गंधी आहे. इथे स्वच्छतेसाठी टेंडर देण्याचे प्रयत्न झाले, पण युनियनची भांडणं आहेत. त्यामुळे येथे कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच बदल्या झाल्यानं मनुष्यबळ कमी झाली आहे’, अशी माहिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी मनुष्यबळाची कमी नसल्याची माहिती दिली होती.
‘क्लास वन आणि क्लास टू या प्रोफेसर्सच्या जागा एमपीएससीच्या माध्यमातून भरतो, पण त्यांनी लवकर नाही भरल्या तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरतो. क्लास तीन त्या टीसीएस मार्फत पाच हजार परिक्षा घेतल्या होत्या त्याचा निकाल लागला आहे. ऑक्टोबर अखेर क्लास तीनची सर्व पदे भरली जातील. क्लास फोरची पदे काही आउटसोर्स करायची असून काही पदं जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीमार्फत भरायची आहेत’, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.


























































