तरुणांनी श्रमदानाने बांधला बांध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदगाव

                                                                                                                                         

दि. 5 (सा.वा.) – ‘माता भूमी… पिता है पानी… यही कह रही है गुरबानी’ या आदर्शाने प्रभावीत होऊन येथील युवा फाऊंडेशनच्या युवकांनी तालुक्यासाठी नेहमीच कमी पर्जन्यमान व बेभरवशाच्या पर्जन्यवृष्टीने जलस्रोतांचे नवीन मार्ग शोधण्यासाठी  पाणी अडविण्याचा आराखडा तयार केला. आज सुमारे दोन लाख लिटर जलसंचय होईल अशा स्वरूपाच्या बांधाचे काम जतपुरा येथे पूर्णत्वास नेले.

सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी शासनासह अनेक संस्था विविध उपाययोजना करत आहेत. या पार्श्वभूमीवर आपणही समाजाचे ऋण समाजसेवेतूनच फेडले पाहिजे अशा भावनेतून सर्व काही पाण्यासाठी या इच्छाशक्तीने भारलेल्या या युवकांनी रणरणत्या उन्हात दररोज दोन तास श्रमदान करीत पहिला दगडी बांध तयार केला. एकूण पाच ते सहा दगडी बांधांची शृंखला व आठ ते दहा सीसीटी तयार करणे असे योजनेचे स्वरूप आहे. त्यांनी जमिनीत मारलेल्या कुदळ, फावडय़ांचा आवाज जतपुऱयात ऐकू येत आहे. राबणाऱया हातांवरचे घट्टे, उन्हात रापलेले चेहरे युवकांच्या निर्धाराची साक्ष देत आहेत. निसर्गाने साथ दिली तर दोन लाख लिटर क्षमतेचा जलाशय भरेल, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होईल व पृष्ठभागावर जलसंचय होईल. आपल्या कष्टाचे पाणी गावकऱयांना मिळेल या अपेक्षेने हे तरुण झपाटले आहेत. जलसंकटाची तीव्रता कमी करण्याच्या मार्गावरील हा एक चिमुकला प्रयत्न असल्याचे युवा फाऊंडेशनचे संस्थापक सुमित सोनवणे यांनी सांगितले. वॉटरकप स्पर्धेसाठी काम करीत असलेले अतुल निकम यांचे त्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळत आहे.

सुमित सोनवणे, कृष्णा खैरनार, संदीप पाटील, सिद्धेश सोनवणे, रवी सोनवणे, पप्पू देशमुख, ईश्वर शिंदे, अरुण राऊत, सचिन बोरसे, बंटी राऊत, करण भावसार, मंदार ढासे, संग्राम कवडे, अथर्व सोनवणे, सचिन बोरसे, निलेश्वर पाटील, सुमित गायकवाड, स्वप्नील दाभाडे या तरुणांनी यासाठी मेहनत घेतली.