
सामना प्रतिनिधी । राहुरी
स्री जातीचे मृत अवस्थेत असलेले अर्भक कचराकुंडी जवळ टाकुन निर्दयी माता पसार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. राहुरींच्या गणपतीघाट स्मशानभूमी रस्त्यावर सायंकाळच्या वेळी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. या निर्दयी मातेचा राहुरी पोलीस शोध घेत आहेत.
एकीकडे राहुरी शहरातील नागरीक गोपाल काल्या निमित्त आयोजित दहीहंडी उत्सवात तल्लीन झाले असताना दुसरीकडे निर्दयी मातेने स्री जातीचे अर्भक कचराकुंडी जवळ टाकुन शहरात खळबळ उडवून दिली आहे. या परिसरातील लहान मुलांना कचराकुंडी जवळ अर्भक मृत अवस्थेत पडलेले दिसून आले. या घटनेची खबर परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उप निरीक्षक लक्ष्मण भोसले, सतीश शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत अर्भक ताब्यात घेतले. मातेची ओळख पटविण्यासाठी अर्भक राहुरी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी वर्षा डोईफोडे यांनी या स्री जातीच्या मृत अर्भकाची तपासणी केली असता अर्भक तीन महिन्याचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या घटने बाबत राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे






























































