
सामना प्रतिनिधी । नगर
बोगस खरेदी केली असल्याचे सांगून जमीन सरकार जमा करावयास लावेन, असे सांगून व्यावसायिकाकडे 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी एका पत्रकाराने केली. तसेच खंडणी न दिल्यास पेपरमध्ये बातमी छापून बदनामी करण्याची धमकीही दिली. ही घटना फेब्रुवारी 2019 पासून वेळोवेळी समक्ष व मोबाईल फोनवरुन सावेडी परिसरात बिशप लॉईड कॉलनी येथे घडली. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
राहूल नॅथनियल पाटोळे (वय 36, रा. बिशप लॉईड कॉलनी, प्लॉट नं. 303, मकासरे हेल्थ क्लब मागे, सावेडी, नगर) यांनी अदलाबदली लेखाद्वारे सावेडी येथील गट क्रमांक 224/2 येथील वर्ग – 2 ची क्षेत्र 82 आर जमीन घेतली आहे. याबाबत पत्रकार जाकीर शेख (रा.अकबरनगर, संभाजीनगर रोड) याने त्याच्या अन्य चार साथीदारांसह पाटोळे यांना ‘तुम्ही ही जमीन बोगस खरेदी केलेली असून ती मी सरकारजमा करायला लावेन’ असे म्हटले. तसे करावयाचे नसल्यास 25 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. व पैसे न दिल्यास पेपरमध्ये बातमी छापून तुमची बदनामी करीन. तसेच पाटोळे यांच्या मित्रांजवळ त्याच्याकडे मी बघतोच, असे सांगत धमकी दिली.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी राहुल पाटोळे यांच्या फिर्यादीवरुन भादविक 385, 506, 34 प्रमाणे खंडणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक इंगळे हे करीत आहेत.































































