
जन्मतः दृष्टिहीन असलेले भावेश भाटिया यांनी मेणबत्तीचा व्यवसाय उभारून देशभरातील हजारो अंधांना रोजगार देत आहेत. फुटपाथवर मेणबत्त्या तयार करण्यापासून भावेश यांचा प्रवास सुरू झाला होता. आज ते याच कामातून देशभरातील हजारो अंध बांधवांना रोजगार मिळवून देत आहेत.
भावेश मूळचे महाबळेश्वरचे. त्यांचा जन्म मुंबईत घाटकोपर येथील. आनुवंशिक समस्येमुळे त्यांना जन्मतः दृष्टी नव्हती. भावेश यांनी एमएपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पोटापाण्यासाठी त्यांनी मेणबत्तीचा साच्या आणि कच्चा माल आणून पाच दृष्टिहीन बांधवांच्या मदतीने हा उद्योग सुरू केला. पारंपरिक मेणबत्ती तयार न करता क्रिएटिव्हिटीची जोड देत वेगळे काहीतरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामध्ये त्यांना यश मिळाले. एकाहून एक सरस आकाराच्या मेणबत्त्या त्यांनी तयार करण्यास सुरुवात केली. आज ते 10,700 डिझाइनच्या मेणबत्त्या तयार करीत आहेत.
9500 जणांना रोजगार
वयाच्या 28 व्या वर्षी भावेश यांनी सुबक, आकर्षक, कल्पक मेणबत्त्या बनवण्याचा उद्योग सुरू केला. त्यांनी मेणबत्ती बनवून पहिल्यांदा फुटपाथवर विकायला सुरुवात केली. या व्यवसायाचा आज वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या कल्पकतेतून तयार झालेल्या मेणबत्त्यांना देशभरात मागणी आहे. त्यांच्या सनराईज पॅण्डलचे 14 राज्यांत मेणबत्ती निर्मितीचे 71 युनिट्स सुरू आहेत. त्यातून सुमारे 9500 अंध बांधवांना रोजगार मिळत आहे.
आकर्षक मेणबत्त्या बनवणे हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. कल्पकतेने तयार केलेल्या मेणबत्त्यांना देशभरातून मागणी आहे. त्याशिवाय मेणापासूनच्या विविध वस्तू, कागदाच्या पिशव्यादेखील अंध बांधव तयार करतात. यातून ते महिन्याकाठी चार हजार रुपयांपासून 40 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत.

























































