
मुंबई महापालिकेच्या विकासासंदर्भात बोलत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘मुंबई’ ही ‘सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे’, असा वाक्प्रचार वापरला. त्यावर दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांनी हरकत घेतली. मुंबईला कोंबडी का म्हटलं, असा त्यांचा आक्षेप होता.
यासंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘मुंबई संदर्भात फार पूर्वीपासून असं बोललं जातं की ही सोन्याची कोंबडी आहे. मात्र हा वाक्प्रचार मराठी साहित्यात वापरला जातो, यात कुठलेही असंसदीय शब्द नाहीत’. पुढे बोलताना ते म्हणाले की,’मुंबईसंदर्भात मी बोललो ते या भगिनींना खटकलं. मात्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांसारख्या व्यक्तींबद्दल राज्यपाल अपमान करणारे शब्द बोलतात त्यावर या भगिनी बोलत नाहीत. फक्त मुंबईबद्दलचा वाक्प्रचार वापरला तर त्याचा अर्थाचा अनर्थ करून सरकारी पक्षाने सभागृहाचे कामकाज बंद पाडलं, अस भुजबळ म्हणाले.


























































