दि पूना मर्चंटस् चेंबरच्या निवडणुकीत घोळात घोळ, तब्बल 10 अर्ज बाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दि पूना मर्चंट्स चेंबरच्या निवडणुक प्रक्रियेत दोन्ही पॅनलमधील 10 अर्ज बाद झाले. यात माजी अध्यक्षासंह विद्यमान संचालकांचेही अर्ज बाद झाल्याने चेंबरच्या गोटात खळबळ उडाली आहे. अर्ज बाद झाल्यानंतर अचानकपणे निवडणुक अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. गेल्या वर्षीही मतमोजणीत 25 मतांचा घोळ झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रक्रियाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

दि पूना मर्चंट्स चेंबरची 15 जागांसाठी 26 नोव्हेंबर रोजी व्दिवार्षिक निवडणूक घोषित झाली आहे. विद्यमान अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष वालचंद संचेती यांच्या नेतृत्वात बाबा पोकर्णा पॅनेल तर नगरसेवक प्रविण चोरबेले, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठीया यांच्या नेतृत्वात प्रोग्रेसिव्ह पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. निवडणुकीसाठी 43 अर्ज आले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या छाणनीत 10 अर्ज बाद झाले. यात बाबा पोकर्णा पॅनेलचे 8 तर प्रोग्रेसिव्ह पॅनेलचे २ अर्ज बाद झाले. त्यानंतर अचानकपणे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राजीनामा दिल्याने पुढील प्रक्रिया अधांतरीच आहे.

प्रोग्रेसिव्ह पॅनलचे राजेंद्र बाठीया म्हणाले, अर्ज छाननीत निवडणूक अधिकारी अ‍ॅड.माधव नवले यांनी दहा अर्ज बाद केले. अर्ज माघारीच्या दिवशी अंतिम यादी जाहीर करणे अपेक्षित असताना अ‍ॅड.नवले हे अर्धवट काम सोडून निघून गेले आणि राजीनामा पाठविला. कार्यकारणीच्या मिटिंगमध्ये दुसरे निवडणूक अधिकारी नेमण्याची मागणी केली. मात्र, चेंबरच्या अध्यक्षांनी ती अमान्य केली. मुद्दाम टाळाटाळ आणि विलंब करण्यासाठी बुधवारी मीटिंग घेऊन दुसरे निवडणूक अधिकारी नेमण्याचा निर्णय घेऊ, असा निर्णय घेतला.

याबाबत चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले,  निर्वाचन अधिकारी यांनी राजीनामा दिला आहे. बुधवारी होणाऱ्या चेंबरच्या कार्यकारणी बैठकीत निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांनतर निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे तेथून पुढी की पुन्हा पहिल्यापासून याचा निर्णय ते घेतील.

निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव!

चेंबरच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालकांचे अर्ज बाद झाल्याने ते या प्रक्रियेतून बाहेर फेकले गेले. अर्ज माघार आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर न करताच ही प्रक्रिया अर्धवट सोडत निवडणूक अधिकारी तेथून गेले आणि त्यांनी थेट मेलवर राजीनामा पाठविला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतःहून राजीनामा दिला का दबावापोटी त्यांना जाण्यास भाग पाडले, अशी चर्चा बाजारात सुरू होती.