भक्ताला पॉर्न साईटची लिंक पाठवली, तिरुपती मंदिर संस्थानाच्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकले

तिरुमला तिरूपती देवस्थानाने त्यांच्या एका कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकलं आहे. हा कर्मचारी संस्थानातील श्री वेंकटेश्वरा भक्ती वाहिनीमध्ये कामाला होता. या वाहिनीवरून भक्तिपर कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येते. या कर्मचाऱ्याची हकालपट्टी करण्यात आल्याचे बुधवारी कळाले असून त्याने एका भक्ताला ईमेलद्वारे पॉर्न साईटची लिंक पाठवल्याचं उघड झालं आहे.

कार्यक्रमाची माहिती मागवली, मिळाली पॉर्न साईटची लिंक

वेंकट कृष्णा नावाच्या भक्ताने श्री वेंकटेश्वरा भक्ती वाहिनीकडे एका कार्यक्रमाबाबत माहिती विचारली होती. या माहितीच्या उत्तराऐवजी त्याला पॉर्न साईटची लिंक पाठवण्यात आली होती. ज्या कर्मचाऱ्याला काढून टाकण्यात आलं आहे त्यानेच हा उपदव्याप केल्याचं चौकशीमध्ये कळालं होतं.

भक्ताने केली देवस्थानाकडे तक्रार

पॉर्न साईटची लिंक आल्याने वेंकट यांना धक्काच बसला. त्यांनी याची माहिती तत्काळ देवस्थानाचे अध्यक्ष वाय.व्ही.सुब्बा रेड्डी आणि कार्यकारी अधिकारी जवाहर रेड्डी यांना कळवली. वेंकट यांच्याकडून ही तक्रार प्राप्त होताच या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे त्यांना आश्वासन देण्यात आले होते.

आणखी काही कर्मचारी यात सामील असण्याची शक्यता

चौकशीचे आदेश देण्यात आल्यानंतर 25 सॉफ्टवेअर इंजिनिअरची नेमणूक करण्यात आली. त्यांनी कॉम्प्युटरमधील माहितीची सखोल तपासणी केली. तपासणीमध्ये ज्या कर्मचाऱ्याला काढून टाकण्यात आलं आहे त्यानेच ही लिंक फॉरवर्ड केल्याचे उघड झाले. या कृत्यामध्ये आणकीही काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांच्या सहभागाचे पुरावे मिळाल्यानंतर त्यांच्याही विरोधात कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. या देवस्थानाच्या अधिपत्याखाली 12 मंदिरे असून एकूण 14 हजार कर्मचारी काम करतात. 16.2 एकर जमीन ही देवस्थानाच्या ताब्यात असून यातील मुख्य मंदीर हे तिरुपती बालाजीचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या