
रस्त्यावरून पायी जाणाऱ्या वयोवृद्धांना थांबवायचे आणि बोलबच्चनगिरी करून शिताफीने त्यांच्याकडील किमती ऐवज हातचलाखीने पळवून नेणाऱ्या इराणी टोळीच्या एका सराईत गुन्हेगारास पार्कसाईट पोलिसांनी गजाआड केले.
हिरामण (नाव बदललेले) हे 72 वर्षीय वृद्ध रविवारी पवईच्या जेव्हीएलआर मार्गावर वॉक करत असताना दोन तरुणांनी त्यांना थांबवले. ‘आपने मास्क क्यूं नही लगाया’ असे दरडावत 500 रुपये दंड भरावे लागतील असे सांगितले. यामुळे हिरामण घाबरले. याचा फायदा उचलत भामटय़ांनी एक कागद हिरामण यांच्याकडे दिला व गळय़ातील सोन्याची चेन आणि अंगठी त्या कागदात काढून ठेवण्यास सांगितली. त्याप्रमाणे हिरामण यांनी चेन व अंगठी त्या कागदात काढून ठेवली. आरोपींनी तो कागद घेतला व चलाखीने दुसरा कागद हिरामण यांच्या हातात दिला आणि पसार झाले. त्यानंतर हिरामण यांनी तो कागद खोलला असता त्यात लहान दगड मिळाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळताच हिरामण यांनी पार्कसाईट पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक विनायक मेर, निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मोहन माने तसेच सुतार, गायकवाड, नवले, तायडे या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
दोघांपैकी एक आरोपी आणि इराणी टोळीचा सराईत गुन्हेगार इरफान जाफरी (31) हा मुंब्रा येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार जगदाळे व पथकाने मुंब्रा येथे जाऊन इरफानच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली. पोलीस त्याच्या दुसऱया साथीदाराचा शोध घेत आहेत.




























































