
मुंबईतून रिक्षा चोरून आणून काही दिवस त्या म्हसवडमध्ये चालवून नंतर विकून टाकणाऱयाला म्हसवड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या तीन रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. माणिक सुखदेव तुपे (रा. कुकुडवाड, म्हसवड, ता. माण) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
कुकुडवाड गावातील माणिक तुपे हा महिना-दोन महिन्यांनी नवीन रिक्षा आणून गावात फिरवीत होता. म्हसवड पोलिसांच्या नजरेतून ही बाब सुटू शकली नाही. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक भुजबळ यांनी तुपे याची चौकशी करण्याचा आदेश पथकाला दिला होता. त्यानुसार पथकाने तपास केला असता, तुपे हा मुंबई येथून चोरून रिक्षा घेऊन म्हसवडमध्ये यायचा. त्यानंतर काही दिवस या रिक्षा वापरून त्या विकून टाकत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पथकाने तुपे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील रिक्षाच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान तुपे याने आणखी दोन रिक्षा चोरून आणल्याचे उघड झाले. तुपे याने चोरी करून आणलेल्या तीनही रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.




























































