लोकसभा निवडणुकीसोबत ‘या’ चार राज्यांच्या विधानसभेच्याही निवडणुका होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चारही विधानसभांचा कार्यकाळ मे-जून 2019 मध्ये संपत असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या निवडणुकांसोबतच जम्मू- कश्मीरच्या विधानसभा निवडणुका होण्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी तेथील विधानसभा बरखास्त केली होती. त्यानंतर सहा महिन्यात तेथे निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे लोकसभेसोबतच तेथे विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. गरज भासल्यास लोकसभा निवडणुकीपूर्वीही जम्मू कश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभांच्या कार्यकाळही मे-जूनमध्ये संपत असल्याने लोकसभेच्या निवडणुकीसोबतच या राज्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी काही दिवसात याबाबतचा निर्णय होणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशासह या राज्यांमध्ये आणि जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि पोलिस बंदोबस्त असेल. त्यामुळे एकत्र निवडणुका घेतल्यास ते सोयीचे होईल आणि खर्चही वाचेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सिक्कीम विधानसभेचा कार्यकाळ 27 मे 2019, आंध्र प्रदेशचा 18 जून, ओदिशा 11 जून आणि अरुणाचल प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ 1 जून रोजी संपत आहे. लोकसभेच्या निवडणुकांची तयारी झाली असतानाच या राज्यांच्या निवडणुका घेतल्यास आयोगाला वेगळी तयारी करावी लागणार नाही. तसेच हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही लोकसभा निवडणुकीसोबत घेतल्यास 2019 मध्ये या निवडणुकांशिवाय कोणत्याच निवडणुका घ्याव्या लागणार नाहीत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे. या दोन्ही सरकारनी सहा महिने आधी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यास या राज्यांच्या निवडणुकाही लोकसभेसोबतच घेण्यात येतील. या दोन्ही राज्यांच्या विधासभेचा कार्यकाळ नोव्हेंबर 2019 मध्ये संपत आहे.