चोरीचे मोबाईल जमिनीत पुरून ठेवायचा चोर, रिंग वाजली अन् झाली उकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या वेळेस घरात शिरून मोबाईल चोरणाऱया चोरटय़ाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. विजय सना सुरेला असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी पकडू नये म्हणून तो चोरलेले मोबाईल घराजवळील एका झाडाखाली खड्डा खणून त्यात लपवून ठेवत होता. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे नऊ मोबाईल हस्तगत केले आहेत.

तक्रारदार हे बोरिवली येथे राहत असून जून महिन्यात ते रात्री झोपले होते. तेव्हा अज्ञात चोरटय़ाने त्याचा मोबाईल चोरला होता. मोबाईल चोरीप्रकरणी त्याने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सूर्यकांत पवार, तावडे, देवकर, आहेर, मोनिका गोम्स आदींच्या पथकाने तपास सुरू केला. ते चोरीचे मोबाईल बोरिवली येथे एका ठिकाणी असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी तपास करून विजयला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी नऊ मोबाईल हस्तगत केले आहेत.

रिंग वाजली अन् झाली उकल

विजय हा सराईत चोरटा आहे. तो पहाटे 2 ते 4 च्या दरम्यान मोबाईल चोरून तो घराजवळील एका झाडाजवळ खड्डा खणून त्यात तो मोबाईल लपवतो. चोरीचे मोबाईल हे बोरिवली येथेच असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. त्या परिसरात शोध घेत असतानाच पोलिसांनी मोबाईलवर फोन केला. मोबाईलची रिंग वाजत होती, मात्र मोबाईल कुठे आहे हे स्पष्ट होत नव्हते. अखेर पोलीस त्या झाडाजवळ गेले. तेथे मोबाईलची रिंग वाजली. पोलिसांनी खड्डा खणला असता एक पिशवी दिसली. त्यातून नऊ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले.