
सामना प्रतिनिधी । अलिबाग
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि रायगड लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुनील तटकरे यांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र म्हसळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला प्राप्त झालं आहे. बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते या नगर जिल्हयातील वडगाव तांदळी इथं राहणाऱ्या व्यक्तीपासून तटकरे यांना धोका असल्याचं पत्रात म्हटल आहे. ही व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असून तुम्हाला ठार मारण्याची सुपारी या व्यक्तीला काही लोकांनी दिली असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
सुनील तटकरे यांच्या नावाने हे पत्र आलं असून म्हसळयाच्या पक्ष कार्यालयाच्या पत्त्यावर मिळालं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हसळा तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी रायगड पोलीसांचे पथक नगरकडे रवाना झाले आहे.






























































