
सामना प्रतिनिधी, मुंबई
अंधेरी पश्चिम येथील चारबंगला परिसरात ‘पॉज’ या पशूप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांना तीन दुर्मिळ कासव सापडले. निळया रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीत हे कासव होते. त्यातील दोन सॉफ्ट शेल्ड तर एक नॉर्दन रिव्हर टेरॅपिन जातीचे होते अशी माहिती ‘पॉज’चे संस्थापक सुनीश सुब्रमण्यम यांनी दिली.
चारबंगला येथे राहणाऱ्या अनुषा अय्यर यांना प्रथम हे कासव दिसले होते. त्यासंदर्भात त्यांनी ‘पॉज’च्या कार्यकर्त्या निशा कुंजू यांना कळवले. हे कासव कुणीतरी पिशवीत भरून सोडून दिले असावेत अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. फेंगशुईसाठी अशी कासवाची पिले घरी आणली जातात आणि ती मोठी झाल्यानंतर फिश टँक कमी पडल्याने त्यांना सोडून दिले जाते असे त्यांनी सांगितले. पशुवैद्यक डॉ. राहुल मेश्राम यांनी या कासवांची तपासणी करून ते निरोगी असल्याचे प्रमाणपत्र दिले. हे कासव सोडून दिले जातील असे ‘पॉज’कडून सांगण्यात आले.






















































