नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार; संस्थाचालकासह तिघे गजाआड

45

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

जनता शिक्षण प्रसारक मंडळाअंतर्गत असलेल्या नृसिंह विद्यामंदिर विद्यालयात शिपायाची नोकरी लावून देतो म्हणून १० लाख रुपये उकळून ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या संस्थाचालक अविनाश जाधवसह तिघांना अटक केली असल्याचे सिडको पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले.

सिडकोमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेस जनता शिक्षण प्रसारक मंडळाअंतर्गत असलेल्या नृसिंह विद्यामंदिरमध्ये शिपायाची नोकरी लावून देतो म्हणून डिसेंबर २०१२ मध्ये १० लाख रुपये घेतले. त्यानंतर संस्थाचालक अविनाश नागोराव जाधव (४२, रा. देवळाई चौक, बीड बायपास) याने त्या पीडित महिलेच्या घरी नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार महिलेस वारंवार बोलावून तिच्यावर अत्याचार केले. महिलने नोकरीसंदर्भात काय झाले, याची विचारणा केली असता संस्थाचालक जाधवने उडवाउडवीची उत्तरे दिली.

दरम्यान, जाधवचे मित्र सुरेश शंकर सिपले (४६, रा. न्यू बालाजीनगर), प्रताप अनंतराव पाटील (४७, रा. सातारा परिसर) या दोघांनी पीडित महिलेची छेड काढून विनयभंग केला, असे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात संस्थाचालक अविनाश जाधव, सुरेश सिपले आणि प्रताप पाटील या तिघांविरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून संस्थाचालक अविनाश जाधव यास सुरेश शिंपले व प्रताप पाटील या तिघांना बुधवारी दुपारी अटक केली असल्याचे पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ झुंझारे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या