
सामना प्रतिनिधी, संभाजीनगर
प्रेमसंबंधावरून झालेल्या भांडणात दोन गट तलवारी घेऊन समोरासमोर भिडले. यात दोन जण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.
जवाहर कॉलनी मनपा कार्यालयाजवळ बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याच्या तसेच महिलेची बदनामी करीत असल्याच्या कारणावरून दोन गट तलवारी घेऊन समोरासमोर भिडले.यात अविनाश चिंधेसह वैशाली गरड हे जखमी झाले. दोन्ही गटांनी तलवारी उपासल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दहशतीमुळे व्यापाऱ्यांनी पटापट दुकाने बंद केली होती. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले.
या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी अविनाश चिंधे यांच्या तक्रारीवरून प्रतीक गरड, वैशाली गरड, गोटू राठोड, गणेशसह चार जणांविरुद्ध तर वैशाली गरड हिच्या तक्रारीवरून योगेश चिंधे, अविनाश चिंधेविरुद्ध गुन्हा दाखल करून योगेश आणि अविनाश चिंधे, विश्वास गोटू, पंढरीनाथ राठोड या तिघांना अटक केली. परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. अटक केलेल्या तिघांना पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांच्यासमोर उभे केले असता, सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी त्या तिघांच्या ताब्यातून तलवार, अन्य साथीदारांची नावे माहीत करून त्यांना अटक करावयाची असल्यामुळे पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली. न्यायालयाने ही विनंती ग्राह्य धरून त्या तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.





























































