
दापोलीतील गिम्हवणे परिसरातील एका घराच्या अंगणात तीन बिबट्यांचा वावर सुरू असल्याने दिसून आले आहे. हे तीनही बिबटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रकाश वैशंपायन यांच्या पत्नी या अंगणात गेल्या होत्या. तेव्हा त्यांना त्यांच्या सारवलेल्या अंगणात प्राण्याच्या पायाचे ठसे दिसले. त्यामुळे त्यांनी गुरुवारी रात्रीचे सीसीटिव्हीचे फूटेज पाहिले. तेव्हा त्यांना अंगणात पहाटे 4.30 वाजता त्यांच्या अंगणातून 3 बिबटया पुढे गेलेले दिसल. शुक्रवारी दुपारीही घराच्या मागे कुत्रे भुंकत होते. त्यामुळे बिबटे घरामगील जंगलात असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. घराच्या अंगणातच तीन बिबट्यांचा वावर असल्याचे समजल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
यापूर्वीही गिम्हवणे येथे एक बिबटया व त्याचे दोन बछडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले होते, याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर त्यांनी घरामगील जंगलात कॅमेरेही लावले होते. तसेच गोडबोले आळीतील ग्रामस्थांची वनाधिकारी यांनी एक बैठक घेऊन बिबट्याने हल्ला करू नये, यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत सूचना दिल्या होत्या.
ग्रामस्थांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी वन विभागाकडे केली होती. मात्र, वन विभागाने पिंजरा लावलेला नसल्याने बिबट्याचा धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बिबट्याचा वस्तीतील वावराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आहे.दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे याना सीसीटिव्ही फुटेज दाखविण्यात आले आहे. गस्तीसाठी शुक्रवारी रात्री वनविभागाचे कर्मचारी गिम्हवणे गोडबोले आळीत पाठविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले





























































