
सामना ऑनलाईन । पुणे
तुमची मुलं पाळणाघरात आहेत, तर मग सावधान राहा. कारण आता पाळणाघरातही तुमची मूलं सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुण्यातल्या कोथरूड परिसरात एका पाळणाघरात 3 वर्षीय चिमुकलीवर दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी पाळणाघर चालक महिला, तिचा मुलगा आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शहरात राहणारे चाकरमानी बहुतांशी मुलांना पाळणाघरात ठेवून कामावर जात असतात. असेच पुण्यातल्या कोथरुडमधील दाम्पत्य दोघेही नोकरी करत असल्यामुळे ते आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीला एका पाळणाघरात ठेऊन कामावर जात असत. मात्र याच पाळणाघरात नराधम आपल्या चीमुकलीला त्यांच्या वासनेचा शिकार बनवतील असं स्वप्नातही त्यांना वाटलं नव्हते. पिडित मुलगी पाळणा घरातून घरी आल्यावर अस्वस्थ वाटत असल्याने तिच्या आईने मुलीकडे याबात चौकशी केल्यावर समोर आलेल्या माहीतीने ती हादरूनच गेली.
पाळणाघर चालवणाऱ्या महिलेचा 17 वर्षीय मुलगा आणि त्याचा 18 वर्षांचा मित्र हे दोघे पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी कोथरूड पोलिसांत तक्रार दिली आहे. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पाळणाघरचालक महिलेसह दोन नराधमांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.
दरम्यान, दोघांनाही कोर्टात हजर केले असता एका आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी केली असून दुसर्या आरोपीला चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


























































