
बँकांमधील आर्थिक गैरव्यवहाराला चाप लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नवा फंडा आणला आहे. त्यानुसार बँकेतील संवेदनशील माहिती ठेवण्याची जबाबदारी असणाऱया अधिकाऱयाला कोणतीही पूर्वकल्पना न देता वर्षातून एकदा सक्तीच्या रजेवर पाठवावे असे परिपत्रक ‘आरबीआय’ने बँकांना पाठवले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आपल्याकडे असलेल्या संवेदनशील माहितीच्या आधारे काही गडबड करत असेल तर ती त्याच्या अनुपस्थितीत समोर आणणे शक्य होईल असेही ‘आरबीआय’ने म्हटले आहे.
सध्या संवेदनशील माहितीचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार करण्याचे प्रकार बँकांमध्ये वाढले आहेत. त्याची दखल घेत ‘आरबीआय’ने संवेदनशील माहिती ठेवणाऱया अधिकाऱयांवर वॉच ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ट्रेजरी, करन्सी, रिस्क मॉडेलिंग विभागात महत्त्वाच्या पदावर काम करणाऱया अधिकाऱयांकडे बँकेची संवेदनशील माहिती असते. त्यामुळे त्यांच्याकडून सदर माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा शोध घेण्यासाठी संबंधित अधिकाऱयाला वर्षातून एकदा जास्तीत जास्त दहा दिवसांच्या सुट्टीवर अचानक पाठवावे. तसेच या काळात बँकेची कोणतीही यंत्रणा त्यांना अॅक्सेस करता येऊ नये याचीही खबरदारी घ्यावी असे ‘आरबीआय’ने बँकांना पाठवलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. पुढील सहा महिन्यांत याची अंमलबजावणी करावी असेही स्पष्ट केले आहे.
काही खासगी बँका, म्युच्युअल फंड क्षेत्रात होतेय अंमलबजावणी
आपल्या व्यवहारात कोणतीही गडबड होऊ नये म्हणून जागतिक स्तरावरील काही खासगी बँका आणि म्युच्युअल फंड क्षेत्रात याची आधीपासूनच अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे एखादा कर्मचारी आपल्याला माहीत असलेल्या संवेदनशील माहितीच्या आधारे गडबड करत असेल तर त्याला जेव्हा सुट्टीवर पाठवले जाते तेव्हा त्याचा छडा लावणे सहज शक्य होत आहे.



























































