Tokyo Olympic पुजा राणीचा ‘पंच’, मेडलपासून फक्त एक पाऊल दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिकमध्ये बुधवारी हिंदुस्थानी महिला बॉक्सर पुजा राणी हिने विजयाने श्रीगणेशा केला. पुजाने 75 किलो वजनी गटामध्ये खेळताना अल्जेरियाच्या इचरक चाईब हिचा 5-0 असा दारुण पराभव केला. या विजयासह तिने क्वार्टर फायनलध्ये प्रवेश केला आहे. पुजाच्या या विजयामुळे हिंदुस्थानच्या मेडल मिळवण्याच्या आशा उंचावल्या असून क्वार्टर फायनलध्ये विजय मिळवल्यास मेडल पक्के होणार आहे.

क्वार्टर फायनलमध्ये 30 वर्षीय पुजाचा सामना चीनच्या ली कियान हिच्याशी होणार आहे. 31 जुलैला हा सामना रंगेल. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा सुवर्णपदक जिंकलेल्या पुजाने चीनच्या ली कियान हिचा दोन वेळा पराभव केला आहे. यंदाही तिने चिनी खेळाडूवर वर्चस्व गाजवल्यास किमान कांस्यपदक पक्के होईल.

तिन्ही राऊंडमध्ये दमदार प्रदर्शन

दरम्यान, पुजा राणी आणि इचरक चाईब या दोघीही पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळत आहेत. मात्र पुजाचा अनुभव अल्जेरियाच्या बॉक्सरवर भारी पडला. पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये पाचही पंचांनी पुजाच्या बाजूने निकाल दिला. तिसऱ्या राऊंडमध्ये इचरक चाईब हिने पुनरागमन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, मात्र पुजाने तिला कोणतीही संधी दिली नाही आणि पंचांनी पुजाच्या बाजूने निर्णय दिला.