रायगडातील धबधबे आणि मुंबईत समुद्रकिनाऱ्यांवर अतिउत्साही पर्यटकांना प्रवेशबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

रायगडातील धबधब्यांवर अतिउत्साही पर्यटकांच्या झालेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील सगळ्या धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयापाठोपाठ मुंबई महानगरपालिकेने चौपाटय़ांवरील धोकादायक परिसरात अतिउत्साही पर्यटकांना बंदी घालण्याचा आली आहे. सध्या हा निर्णय जुहू चौपाटीपुरता घेण्यात आला असला तरी लवकरच हा निर्णय मुंबईतील उर्वरीत चौपाट्यांसाठीही लागू करण्यात येणार आहे.

मराठी वृत्तपत्र लोकसत्ताने चौपाट्यांवरील दुर्घटनाग्रस्त परिसरात पर्यटकांना बंदी घालत असल्याचं वृत्त दिलं आहे. अनेकदा पर्यटक पोलिसांना जुमानत नाहीत. पाण्यात जाऊ नका असं सांगितल्यानंतरही काही पर्यटक दारू पिऊन सुरक्षारक्षक आणि जीवरक्षकांशी हुज्जत घालतात, त्यांना मारहाण करतात. दारू पिऊन पाण्यात गेल्यावर त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही ज्यामुळे त्यांचा जीव जातो. या दुर्घटना टळाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

जुहू चौपाटीवर दोन दिवसांपूर्वी पाच तरुण बुडाले होते. त्यातील चार जणांना शोधण्यात यश आलं असून यातील फक्त एकाचाच जीव वाचू शकला आहे. पाचवा तरूण अद्याप बेपत्ता आहे. धबधब्यांवरही अशाच प्रकारच्या दुर्घटना घडल्याचं आपल्याला दरवर्षी ऐकायला मिळतं. उंचावरून उडी मारल्याने दगडावर आपटून किंवा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पर्यटकांचा मृत्यू होत असतो. या घटना रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यास सुरूवात झाली आहे.