मेट्रो मार्गावर रुळ टाकण्यास सुरूवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गावर पिंपरी चिंचवड ते रेंजहिल्स या 11.57 कि.मी टप्प्यात अत्यंत वेगाने उन्नत मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. या मार्गावरच मेट्रोने डिसेंबर 2019  मध्ये चाचण्या पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. या अनुषंगाने या मार्गावर लोहमार्ग टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

हे रेल्वे रुळ अत्याधुनिक फ्लॅश बट व अॅल्युमिनाथर्मिट वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. या रुळांचा वरचा भाग (हेड) हा विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे कठीण (हार्ड) केलेला असेल. त्यामुळे या रुळाची झीज कमी होईल व त्यामुळे रुळांचे आयुष्य वाढेल व रुळ बजलण्याची लवकर आवश्यकता पडणार नाही. सध्या नागपूर मेट्रोकडून 600 मेट्रिक रुळ मागवले आहेत. संपूर्ण प्रकल्पासाठी 9,000 मेट्रीक टन रुळांची गरज आहे. हे रुळ इस्ट मेटल या स्वित्झर्लंडच्या कंपनीने सायबेरियातील कारखान्यांत बनवले आहेत.

सामान्यत: रेल्वे प्रणालीत रेल्वेरूळ दगडाच्या खडीवर टाकण्यात येतात, जेणेकरून रेल्वेरुळावरून कोच जाताना रेल्वेरूळ खाली दाबले जाऊन कुशनसारखा परिणाम साधता येतो. मात्र, या प्रकारच्या रुळांचे अनेक तोटे असल्याने पुणे मेट्रोमध्ये खडी विरहीत रुळ टाकण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना आरामदायक प्रवास करणे शक्य होणार आहे.

पुणे मेट्रो प्रकल्प नियोजित वेळेनुसार सुरू करण्यासाठी संपूर्ण नियोजन झाले असून, तयाचाच एक भाग म्हणून रुळ टाकण्याचे काम सुरू आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांनी सांगितले.