
सामना ऑनलाईन । पाटणा
बिहार-बंगाल सीमेवर आदिवासी आणि मुस्लिम समाजात संघर्ष उभा राहिला आहे. ईदनिमित्त काही मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी आदिवासींच्या जमिनीवर गेले होते. हे लोक आपले जमीन बळकवण्यासाठी आल्याच्या संशयातून आदिवासींनी मुस्लिम लोकांवर हल्ला चढवून त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. यात काही मुस्लिम बांधव जखमी झाले आहेत.
दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार बिहार बंगाल सीमेवर धुलबरी गावात काही मुस्लिम समाजातील चहाच्या मळ्यात नमाज पठणासाठी गेले होते. जेव्हा हे लोक नमाज पठणासाठी आले तेव्हा आदिवासींना वाटले की हे लोक आपली जमीन बळकावतील. यामुळे आदिवासींनी धनुष्य बाण काढले आणि या मुसलमानांवर सपासप बाण चालवायला सुरुवात केली.
आदिवासांनी धनुष्य बाणाने केलेल्या या हल्ल्यात 23 जण जबर जखमी झाले असून काहींच्या पोटात, छातीत बाण घुसले तर काहींच्या, कमरेत, गुडघ्यात आणि इतर ठिकाणी बाण लागले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
























































