
मुंबईला पर्यटनदृष्टय़ा सुंदर बनवण्यासाठी पालिका अनेक उपक्रम राबवत असून आता फोर्टमधील हेरिटेज वास्तूंच्या परिसरातील बस स्टॉप पारदर्शक स्वरूपात बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिसरातील हेरिटेज वास्तूंचे सौंदर्य पाहता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमात 11 बस स्टॉपचे रुपडे पालटणार आहे.
मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिका रस्ते, वाहतूक बेटे आणि मोठय़ा ब्रीजच्या खालील भागाचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. यात फोर्ट परिसरातील फुटपाथला आणि ‘बेस्ट’ बस स्टॉपना नवा साज देण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर तसेच फोर्ट भागातील महात्मा गांधी मार्गावरील हुतात्मा चौक परिसर, नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, एस्प्लेनेड मॅन्शन, मुंबई विद्यापीठ येथील जुन्या इमारती युनेस्कोने हेरिटेज म्हणून जाहीर केल्या आहेत. या वास्तूंचे आणि परिसराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी पालिकेने सन 2018 मध्ये या भागातील रस्ते, फुटपाथ हेरिटेज दर्जाचे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात फुटपाथ दुरुस्ती करण्यात आली आहे.
असे होणार सौंदर्यीकरणाचे काम
या उपक्रमात फोर्ट भागातील जहांगीर आर्ट गॅलरी ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील बेस्टचे जुने बसथांबे बदलण्याचे प्रस्तावित आहे. सध्याचे स्टेनलेस स्टील बसथांबे हेरिटेज वास्तूंना शोभेसे नसल्याने आणि या प्रकारच्या बस थांब्यामुळे हेरिटेज वास्तू पाहताना व्यत्यय येत असल्याने त्या जागी परदेशातल्या थांब्यांप्रमाणे संपूर्ण काचेचे थांबे बसवले जाणार आहेत. मजबूत पारदर्शक काचा, अॅस्थेटिक लूकचे बसथांबे बनवण्यात येत आहेत.
हेरिटेज वास्तू आणि बसथांब्यांचे सौंदर्य जतन करण्यासाठी या भागातील फेरीवाल्यांच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत. फेरीवाल्यांना बनवून दिल्या जाणाऱया ’पीच’मध्येच व्यवसाय करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच हेरिटेज वास्तूंचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी नागरिकांना बसण्यासाठी हेरिटेज लूक असलेली आसनव्यवस्था केली जाणार आहे.
































































