
गणेशोत्सवादरम्यान संगमेश्वर ते देवरुख या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले असले तरी प्रवाशांचे हाल काही थांबलेले नाहीत. बुरंबी ते लोवलेदरम्यान रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या मार्गावर प्रवास करणे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहे. यातच या मार्गाची एका बाजूची साईडपट्टी धोकादायक बनली असून खाजगी कंपनीने केबल टाकल्यानंतर साईड पट्टीची दुरुस्ती न केल्याने अनेक वाहने साईड पट्टीजवळ अडकत आहेत. या सर्व बाबींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या हे खड्डे दगडी चिऱ्यांनी भरले जात आहेत, मात्र हे फक्त तात्पुरते उपाय असल्याचे स्थानिक सांगतात. पाऊस पडल्यानंतर हे खड्डे आधीपेक्षा अधिक धोकादायक बनत आहेत. या मार्गावरून सद्यस्थितीत दुचाकी वाहने अत्यंत धोकादायक बनले असून अनेक दुचाकीस्वार खड्ड्यातून वर आलेल्या खडीवरून घसरून अपघात ग्रस्त होत आहेत. साडवली दरम्यान देखील रस्त्याला दोन ठिकाणी मोठे खड्डे आहेत. गणपतीच्या काळात लाखो भाविक या मार्गावरून ये जा करतात मात्र रस्त्याची अवस्था पाहता प्रशासनाची कार्यक्षमता पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर ठोस उपाय करावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
एप्रिल आणि मे या दोन महिन्यात खाजगी कंपनीने ऑप्टिकल फायबर केबल टाकताना या मार्गाच्या साईड पट्टीची पूर्णता दुर्दशा करून टाकली. साईड पट्टीचे गाईड स्टोन इतस्तता विखरून टाकले. साईड पट्टीवर मोठ मोठे दगड आजही अपघातास निमंत्रण देत आहेत. याबाबत मे महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांची संपर्क साधला असता त्यांनी सदर साईड पट्टीवर केबल टाकणाऱ्या ठेकेदाराकडून रोलर फिरवून घेणार असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात या मार्गावरील साईड पट्टीवर कोठेही रोलर फिरवला गेला नाही. परिणामी पावसाळ्यात ठीक ठिकाणी साईड पट्टीजवळ गेलेली वाहने अडकली आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुखच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अवजड वाहन चालकांना याचा मनस्ताप अजूनही सहन करावा लागत आहे. मुंबई गोवा आणि मिऱ्या नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा संगमेश्वर साखरपा हा ३२ किलोमीटरचा मार्ग राजापूरकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून देखील वापरला जातो. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे वाहन चालकांसह प्रवाशांसाठी दररोजची शिक्षा ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे देखील या रस्त्याच्या दूर्दशेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल वाहनचालकांसह प्रवासी आणि पादचाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.